महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्यांची होणार ‘थर्मल स्क्रीनिंग’
शिवराज सिंह चौहान सरकारची नवी नियमावली

भोपाळ – महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवी अॅडव्हायझरी जारी करत म्हटले आहे, की महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग होईल. याच बरोबर विनामास्क दिसणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्यात यावी, असा आदेशही शिवराज सरकारने दिला आहे.
राज्यातील गृह विभागाने भोपाळ, इंदौर, होशंगाबाद, बैतूल, सिवनी, छिंदवाडा, बालाघाट, बरवानी, खंडवा, खरगोन, बुरहानपूर, अलिराजपूर आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, की त्यांनी डिस्ट्रिक्ट क्रायसिस मॅनेजमेन्ट कमिटीसोबत कोरोनाच्या स्थितीवर बैठक करावी.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या स्थितीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्यातील मंत्री विश्वास सांरग म्हणाले, “राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी महाराष्ट्राला लागून असलेल्या आमच्या जिल्ह्यांच्या सीमांवर आम्ही चेकिंगची व्यवस्था करत आहोत. जे लोक महाराष्ट्रातून येतील त्यांची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल.”
“आता मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांत ‘शिवरात्री यात्रा’ होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून लोक येत असतात. मात्र, सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी संकट व्यवस्थापन समितीला यासंदर्भात योजना तयार करायला सांगितले आहे,” असे सांरग यांनी सांगितले.