आरोग्य

महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन धोकादायक : डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात कोरोनाचा नवा स्ट्रेनही आला आहे. भारतात आतापर्यंत नव्या कोरोना स्ट्रेनचे २४० रुग्ण आढळले आहेत. त्यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध अशा एम्स रुग्णालयाच्या संचालकांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात आढलेला हा नवा स्ट्रेन हा अधिक धोकादायक असल्याचे मत एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केले आहे. या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणं कठीण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोनाची लस ही नव्या स्ट्रेनवर जास्त प्रभावी नाही, मात्र या लसीमुळे नव्या स्ट्रेनच्या प्रसार रोखण्यासाठी उपयोग होईल असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे याआधी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या लोकांनाही पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते असेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन हा कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येचे कारण ठरत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे फैलाव हा झपाट्याने होत आहे. त्यामागेही कोरोनाचा नवा स्ट्रेन कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील काही भागात आणि यवतमाळ, अकोला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अमरावती, अकोला, वर्धा यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील जनतेशी कोरोनाविषयी संवाद साधला. राजकीय, शासकीय, धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button