बलात्कारी मंत्र्यांना वाचविण्याचा सरकारचा प्रयत्न; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

पुणे -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावर आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील मंत्रीच बलात्कारी झाले आहेत आणि या बलात्कारी मंत्र्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना पाठबळ दिले जात आहे, असा गंभीर आरोप करत वाघ यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रत्यक्षदर्शींच्या चौकशीचे काय झाले? मोबाईल, लॅपटॅापचे काय झाले, माहीत नाही. संजय राठोड हा आरोपी फरार असताना अहवाल दिलाच कसा? अशी विचारणा करत संजय राठोडच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्ण होऊ शकत नाही. आधी त्याची चौकशी करा. सर्व पुरावे समोर आले असतानाही आरोपी सापडत नाही, असे म्हणत, पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या.
राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असे मला अजूनही वाटते. बंजारा समाज हा राठोड यांच्यासोबत नाही. मला अनेकांचे फोन येत आहेत, पुजाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी होत आहे, असेही वाघ म्हणाल्या.