पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेवर भाजपचा सवाल
नवी दिल्ली – पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. याच दरम्यान भाजपाने आज परवर्तन यात्रेचे आयोजन केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा यामध्ये सहभागी झाले आहे. परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये अमित शहांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. “ममता बॅनर्जींचं सरकार असेपर्यंत येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
अमित शहा यांनी “आगामी विधानसभा निवडणूक ही आमचे बूथ कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसमधील लागेबांधे असणाऱ्यांमध्ये होणार आहे. ममता बॅनर्जींना सत्तेपासून दूर करणं हे आमचं ध्येय नाही. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बदलणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. राज्यातील गरीब जनतेची परिस्थिती सुधारणं, राज्यातील महिलांची परिस्थिती सुधारणं हेच आमचं प्राधान्य असणार आहे” असं म्हटलं आहे. भाजपाने सुरू केलेल्या निवडणूक प्रचारामधील ही पाचवी परिवर्तन रॅली आहे. रॅलीमधून तसेच सभांमधून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.