राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे विदर्भातील एक नेते संजय राठोड यांच्यावर पुजा चव्हाण प्रकरणी गेली 15 दिवस जे आरोप होत आहेत, त्या संदर्भात स्वतःची भूमिका न मांडता आजवर गायब असणारे राठोड काल पोहरादेवी येथे प्रगट झाले. मात्र त्यावेळी त्यांनी आणि समर्थकांनी केलेले शक्ती प्रदर्शन लोकशाही व्यवस्थेची मान शरमेने झुकवणारे होते.
पुजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात अपघाती मृत्यू झाल्यावर ज्या पद्धतीने ना.संजय राठोड यांचे संभाषण आणि तिच्या सोबतची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत, त्यावरून या दोघांचा उत्तम परिचय असावा यात कुणाला शंका नाही. भाजपच्या महिला आघाडीने याप्रकरणी थेट संजय राठोड यांचे नाव घेवून पुजाच्या आत्महत्याप्रकरणी राठोड यांना अटक करण्याची मागणी केल्यावर राठोड यांनी माध्यमांपुढे येवून भूमिका स्पष्ट करून प्रश्नोत्तरांना सामोरे जाण्याची गरज होती. मात्र ते टाळून आज राठोड पोहरादेवीच्या धर्मपिठाला नतमस्तक झाले.
*कोरोनाचा सर्वत्र उद्रेक सुरू असताना राठोड यांच्या समर्थकांनी जी गर्दी आणि शक्ती प्रदर्शन केले त्याचे कोणत्याच पातळीवर समर्थन होवू शकत नाही*. यवतमाळ वरुन निघाल्यावर पोहरादेवी येथे पोहोचेपर्यंत मार्गात त्यांचे ज्या पद्धतीने स्वागत, वगैरे करण्यात आले त्यावरुन राठोड जणू एखादा पराक्रम करुन तर मायदेशी परतले नसावे ना असे वाटायला लागले होते. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी समजली जाते. धर्मगुरू संत रामराव महाराजांनी जिथे देह ठेवला. त्याच परिसरात समाजाचे धर्मपीठ आहे. किमान धर्मपिठावर तरी ना.संजय राठोड सत्य काय ते समाजाला सांगतील, माध्यमांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे देतील असे वाटले होते. मात्र त्यांनी केवळ मोघम निवेदन करून जी प्रश्नोत्तरे टाळली त्यातून त्यांच्या विषयीचा संशय अधिक बळावला आहे, हे त्यांच्या लक्षात यायला हवे.
आपण चार टर्म निवडून आलो आहोत. त्यामुळे कुणीही सोबत फोटो काढू शकतो, असे सांगताना त्यांची देहबोली अपराधभाव धारण करून असल्याचे लक्षात येते. मंत्र्यासोबत कुणीही फोटो काढतो हे अर्थसत्य त्यांनी सांगितले. मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करताना सोबत कुणी असेल तर अशी व्यक्ती अनोळखी कशी काय? असु शकते? याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. संजय राठोड आज घराबाहेर पडणार हे लक्षात आल्यावर पुजा चव्हाण आणि संजय राठोड यांची जी छायाचित्रे नव्याने व्हायरल झाली त्यातून या दोघांची मैत्री अधिक अधोरेखित व्हायला मदत होते.
बंजारा समाजातील सामान्य कुटूंबातील एका उदयोन्मुख कलावंत तरुणीचा गुढ मृत्यू होतो आणि समाजाच्या नेत्याचे नाव त्या प्रकरणात पुढे आल्यावर समाज ज्या पद्धतीने तपासाच्या आधीच नेत्याच्या पाठिमागे उभा राहतो हे अधिक गंभीर आहे*. नेत्याची पाठराखण करताना आपण आपल्याच एका भगिणीवर अन्याय करीत आहोत, असे कुणालाही वाटत नाही, पुजाच्या पित्याने दिलेल्या बचावाचा आधार घेवून समाज अगोदरच कुठल्या निष्कर्षावर पोहोचत असेल तर न्यायपिठापेक्षा धर्मपीठ प्रभावी ठरू लागले आहे, असा अर्थ लोकांनी काढला तर त्यात गेर काय?
वनमंत्री संजय राठोड हे आरोपी किंवा अपराधी आहेत असे कुणीही म्हटलेले नाही, आरोपांचे त्यांच्यावर जे ढग दाटले आहेत, त्यातून बाहेर पडण्याची संधी त्यांना होती. मात्र नव्याने जाहीर झालेल्या वाढदिवसांच्या फोटोंनी त्यांच्या अडचणी वाढल्याने कदाचीत माध्यमांशी संवाद न साधताच त्यांनी रवाना होणे फायद्याचे मानले असावे.
राठोड यांनी काही मिनिटांचे जे निवेदन केले त्यातून पुजा चव्हाण यांना तेे ओळखतही नाहीत असे दिसते. मात्र प्रश्नाला उत्तरे देण्याचे त्यांनी टाळल्यामुळे जनतेपुढे त्यांची नेमकी बाजू जावू शकली नाही, नव्याने व्हायरल छायाचित्रे, संवाद फिती आणि यवतमाळ रुग्णालात झालेला गर्भपात या सगळ्याच प्रश्नांना त्यांना आज ना उद्या सामोरे जावेच लागेल तरच संशयाचे धुके कमी होईल.