दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च व एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी – बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान तर दहावीची २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल. याचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, यादृष्टीने एप्रिल, मे २०२१ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची ही सुविधा फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व परीक्षा द्यावी, असे मंडळाने नमूद केले आहे. अन्य यंत्रणेने छपाई केलेले व व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियाद्वारे व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. सदर वेळापत्रकाबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या २२ फेब्रुवारीपर्यंत मंडळाला कळवाव्यात, असेही सांगण्यात आले आहे.