…तर कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या; हसन मुश्रीफांचं विरोधकांना आव्हान
कोल्हापूर : अधिवेशन आलं की कोरोना होतो हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढंच वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. यावेळी विरोधकांनी कोरोनावरुन राजकारण करणं थांबवावं, असा सल्लाही त्यांनी दिला.
ग्रामविकास मंत्री हसम मुश्रीफ यांनी विविध विषयांवर संवाद साधला. संजय राठोड प्रकरण, महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच ग्रामविकास विभागाचे कार्यक्रम यावरच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. हे सरकार अधिवेशनापासून पळ काढण्याचं निमित्त शोधतंय. त्यामुळे अधिवेशन तोंडावर असताना यांनी कोरोनाची हूल उठवली. तसंच ऐन अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड प्रकरण बाहेर आल्याने विरोधक याच प्रश्नावर अधिवेशनात कोंडी करतील, हे सत्ताधाऱ्यांना माहितीय, असा आरोप विरोधकांनी केला. त्यांच्या याच आरोपांना हसन मुश्रीफ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. “जर एवढचं वाटतंय तर विरोधकांनी त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं”, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याच आधीच जाहीर केलंय. कोणत्याही चौकशी शिवाय कारवाई करणं चुकीचं होईल धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची कशी फजिती झाली ते आपण पहिलं आहे, असं मुश्रीफ म्हणाले. संजय राठोड यांनी राजीनाम्यावर बोलताना मात्र मुश्रीफ यांनी सावध प्रतिक्रिया दिली. या बाबत मला अधिक माहिती नाही मात्र मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असं म्हणत त्यांनी राजीनाम्यावर अधिक बोलणं टाळलं.