फोकस

डायरेक्ट प्रेमाच्या गावाला जावे…!

‘लव्ह म्हणावे की प्रेम म्हणावे, इश्यू हे फुकटचे सोडून द्यावे… डायरेक्ट प्रेमाच्या गावाला जावे…’ अशीच अनुभुती देणारा हा गुलाबी व्हॅलेंटाईन महिना अर्थातच  ‘द मोस्ट अवेटेड फेब्रुवारी’. फेब्रुवारी महिना म्हणजे तमाम प्रेमीजनांना हवाहवासा कालावधी…! पहाटेच्या उबदार गुलाबी थंडीतल्या हळूवार आठवणी, पाहिलेली स्वप्ने आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा नात्यांना आणखी ताजेतवाने करणारा व्हॅलेंटाईन दिवस..! या पार्श्वभूमीवरच, राज्यभरात सध्या सर्वाधिक चर्चिल्या जाणाºया हनी ट्रॅप आणि नाजूक नात्यांचा घेतलेला हा धांडोळा…!

हनी ट्रॅप की मनी ट्रॅप, कशाला हवा लोकनिंदेचा मॅप  ?
मी तुझा नि तू माझी, इतकंच पुरेसं नाही का…?
सेकंड लेडी अथवा सेकंड सेक्स किंवा वन नाईटचे नाते फिक्स
पहिलीकडून दुसरीकडे वळताना, उणीवा फक्त त्याच्याच का दिसाव्यात?
असतील शिल्लक अपेक्षा त्याला, कारभारणीने का नकार द्यावा..?
दुसरेपणाच्या नात्यात, नेहमीच दोषाचे जळते निखारे
पण तरीही पे्रमात पडतात सारे, कुणी नेते, कुणी अभिनेते
कुणी पोलीस, कुणी शिक्षक, प्रत्येकजणच समाधानाच्या शोधात
घराघरांत हुंदके परकेपणाचे, सेकंड होमला प्रतिक्षा आपुलकीची !
न्यायदात्या, हो उदार आणि पुन्हा आण कायदा 1955 पूर्वीचा..
ना राहिल हनी ट्रॅप, ना बनेल मनी ट्रॅप…!

संपूर्ण महाराष्टÑात चर्चेचा विषय ठरलेल्या आमदार धनंजय मुंडे आणि त्यांची मेहुणी रेणू शर्मा यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपानंतर सुचलेल्या या चार ओळी. रेणू शर्माने त्यांच्यावरील सर्व तक्रारी मागे घेतल्या असल्या तरी या गंभीर आरोपामुळे एक नवे वांदग निर्माण झाले. धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सर्वच राजकीय पक्ष नेत्यांनी त्यांना पाठीशी घातले, खुद्द शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मुंडे यांना फारसा त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली दिसली. अगदी तशीच काळजी जशी भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि चौफुल्यातील लावणी कलाकार बरखा यांच्या प्रकरणाचे सत्य समोर आल्यानंतर स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. बाळासाहेबांनी या प्रकरणाला पाठींबा देताना ‘जब प्यार किया तो डरना क्या ? ’ असे म्हणत त्यातील विरोधकांची हवाच काढून घेतली होती. आत्ताही नेमक्या अशाच नाजूक प्रकरणांत पुन्हा एकदा मुंडेच अडकले आणि विरोधकांची हवा काढून घेण्याचे काम पवारसाहेबांना करावे लागले. हा राजकारणातील कुरघोडीचा विषय असे म्हणून त्यातील तथ्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, म्हणूनच अपरिहार्यपणे राजकारणात घडणाºया अशाप्रकारच्या हनी ट्रॅपचा विचार गांभीर्याने करावा लागणार आहे. मुळातच राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशभरातील राजकीय नेत्यांच्या आयुष्यात अशा नाजूक घटना घडणे तसे नवे नाही.
युद्धजन्य परीस्थितीत अगदी महाभारतापासून एखाद्या रुपवतीचा वापर शस्त्रासारखा केला गेला आहे. याच रणनीतीचा वापर तुल्यबळ खेळांच्या स्पर्धेतही बेमालुमपणे केला गेल्याची उदाहरणे आहेत. जगाच्या राजकीय इतिहासात अशा ठळक गोष्टींमुळे अनेकदा उलाथापालथही झाली आहे. अनेकदा हनी ट्रॅपच्या नावाखाली स्वत:ची विषयासक्तता अनुभवणारे महाभागही आढळले आहेत. ‘सापडला तो चोर’ या धर्तीवर अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध यातील सत्यता उघडकीस आल्यानंतर राजकीय धोका आहे, हे लक्षात येताच त्याला हनी ट्रॅपच्या गोंडस नावाखाली दडपण्याचे काम यापूर्वी अनेकदा करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणात फक्त राजकीय कुरघोडी, हनी ट्रॅप, त्यांना तीन अपत्ये असण्याचे सत्य यामुळे धोक्यात आलेली त्यांची आमदारकी, मंत्रीपद इतक्यापुरतेच हा विषय मर्यादित राहत नाही, तर दुसरेपणाच्या एका विषण्ण सत्यतेत जगणाºया असंख्य महिलांच्या न्याय हक्कासाठी या घडीला आपल्याकडे कोणतीच न्याय्य व्यवस्था नाही, ती करावी यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही हेच पुन्हा एकदा या प्रकरणावरुन अधोरेखित होते आहे.
वास्तव हे कल्पितांहून अगदीचअनभिज्ञ, अनाकलनीय असते हे आपण अनेकदा अनुभवतो. सिनेमा, मालिकांमध्ये घडणाºया घटना आपल्या आसपास घडायला लागतात तेव्हाही त्या आपली मती गुंगवणाºयाच ठरतात. रवींद्र गुर्जर यांनी भाषांतरीत केलेल्या सेकंड लेडी या मूळ इंग्रजी पुस्तकात एक आभासी कथा साकारली आहे. त्यातील कथेनुसार, अमेरिकेच्या राष्टÑाध्यक्षांची पत्नी हुबेहूब बदलली जाते, इतकी की तिच्यासोबत रतीक्रीडा करताना ती आपली पत्नी नाहीच असा कणभरही संशय राष्टÑाध्यक्षांना येत नाही. अत्यंत उत्सुकता ताणवणारे हे पुस्तक आजही मोठ्या प्रमाणात वाचले जाते आहे. मात्र या पुस्तकांतील हनी ट्रॅपला आपलेसे करणाºया तमाम अमेरिकनांनी जेव्हा मोनिका लेविन्स्की आणि बिल क्लिंटन यांच्यातील लैंगिक शोषणाचे आरोप प्रत्यारोप सुरु झाले तेव्हा त्यातील वास्तव स्वीकारत मोनिकाची साथ दिली आणि अर्थातच बिल क्लिंटन यांच्या पसंतीला ओहोटी लागली. विवाहबाह्य संबंधाना नाकारणाºया अमेरिकनांनी नुकतेच पायउतार झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसºया पत्नीला फर्स्ट लेडीचा सन्मान देवू केला होता, हेही सत्यच !
राजकीय नेत्यांवर होणाºया नाजूक आरोपांतून फक्त पुरुष मंडळीच नाही, तर महिला नेत्यांचीही आजवर सुटका झालेली नाही हा इतिहास आहे. अगदी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते महाराष्टÑाच्या पहिल्या महिला महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनाही अशा प्रकारच्या प्रसंगांना, आरोप, वाद विवादांना सामोरे जावे लागले आहे. राज्यातील एका ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याने बुद्धिमान आणि देखण्या महिलांच्या सहवासात राहणे कोणाला आवडत नाही, मलाही आवडते, असे वक्तव्य करुन प्रतिप्रश्न निर्माण केला होताच की! भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यावरही त्यांच्या मैत्रिणींबाबत आरोप झाले होते. पंडीतजींनी आपल्या मैत्रिणींना लिहिलेली पत्रेही नंतर माध्यमांसमोर आली आहेत. काश्मिरपासून ते मुंबईपर्यंतच्या अनेक नेतेमंडळी, साहित्यिक, अभिनेते, उद्योजक यांच्या नाजूक प्रकरणांनी आजवर जनतेला अचंबितच केले आहे. अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी यावर सखोल भाष्य स्वतंत्रणाने केले आहे.
मुळातच महिला अशाच पुरुषाच्या प्रेमात पडतात ज्याच्याकडे धाडस आहे, जो सगळ्या जगासोबत लढू शकतो, ज्याच्याकडे फक्त पैशांचीच नाही तर सत्तेची आणि मनगटाचीही ताकद आहे. कदाचित म्हणूनच राजकीय नेत्यांभोवती असणाºया वलयांकित चेहºयांसोबत गॉसिप अधिक होते.
राजकीय नेत्यांवर जेव्हा असे आरोप होतात, तेव्हा राजकारण, महत्वांकांक्षा आणि चारित्र्य यांची एकत्रित तपासणी करु नये. कारण तसे केले तर सगळ्यांचीच गल्लत होईल. राजकारणात केवळ समाजकारणासाठी गावचे, राज्याचे, समाजाचे भलं करण्यासाठी कुणी प्रवेश करीत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे राजकीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’असा चौफेर हल्ला करतो तोच अचूकपणे या आखाड्यात टिकून राहतो. महत्वाकांक्षा अर्थकारणाभोवती फिरत असते आणि अर्थकारणाचे समिकरण फक्त राजकारणातच योग्यप्रकारे जुळवता येते, हे वास्तव नाकारता येत नाही. यातही माणसाची वृत्ती महत्वाची ठरते. घटना कोणतीही असो निसर्ग आपले काम करीत असतो. जेव्हा एखाद्या गोष्टींचा, वृत्तीचा अतिरेक होत राहतो तेव्हा त्याचा शेवट झाल्याशिवाय राहत नाही. एखादा गुन्हा दाबून ठेवला जातो तेव्हा तो तितक्याच वेगाने जगाच्या समोर येतो.
प्रेम कुणी कुणावर आणि कितीवेळा करावे यावर जसे कोणाचेही बंधन असत नाही… प्रेमाचं काय ते आजही होते आणि उद्याही असते. ते आज हिच्यावर – याच्यावर असेल ते उद्या आणखी कोणावरही असू शकते. मात्र हेही तितकेच खरे की, समाजाला मान्य असणारे, लोकांनाही मार्गदर्शक ठरावे असे पे्रमाचे धडे मिळाले तर ते कोणाला आवडणार नाही..? पण तसे घडताना दिसत नाही. एखाद्याच्या प्रेमाची गाथा अजरामर होते, अनुकरणीय ठरते जेव्हा तिच्यात नात्याचा एक ग्रेस, प्रेमाची एक उंची गाठलेली असते. केवळ स्वार्थ आणि हव्यास असणाºया पे्रमात हनी ट्रॅपचा शिरकाव झाला की त्यातले प्रेम आटले हे लक्षात घ्यावे.
महाराष्टÑाच्या राजकारणात पूर्वांपार सुरु असणारे हे नाजूक ट्रॅप पाहता राजकारण हे शुद्ध, सात्विक, तत्ववादी, सामाजिक हितासाठी पवित्र कार्य वगैरे सगळ्या अंधश्रद्धाच आहेत याची खात्री पटायला लागते. कुणी सांगावे धनंजय मुंडेंच्या आयुष्यातील नाजूक नात्यात सुरु असणारी धुसफुस आणि गत 20 वर्षापासून सर्वांना परीचीत असणारे कौटुंबिक नाते या सर्वांमुळेच त्यांचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी खुद्द मेहूणीलाच या हनी ट्रॅपमध्ये ओढले गेले नसेल…? यातून धनुभाऊच्या मार्गाने मार्गक्रमणा करणाºया सर्वांसाठीच आपल्या लायकीत रहा असा इशारा दिला गेला नसेल ना…? कारण काहीही असो मात्र राजकीय जीवनात अशा प्रकारच्या धुलवडीमुळे नेत्याची प्रतिमा मलिन तर होतेच शिवाय त्याचा आत्मविश्वासही डळमळीत होतो, हे नाकारता येत नाही.
या प्रकरणात वारंवार जिचा उल्लेख होत राहिला ती ‘हनी ट्रॅप’ यंत्रणा भारताला आणि महाराष्टÑाला तशी नवी नाही. मात्र दरवेळी हा हनी ट्रॅप नवनव्या स्वरुपात अवतरतो ती पद्धत आणि त्यामागचे कारण भलतेच बदलते आहे.
आपणा सर्वांना ज्ञात असलेल्या, महाराष्टÑातील पहिल्या महिला खासगी डिटेक्टीव्ह रजनी पंडीत यांनी आपल्या कामातून लोकांचा विश्वास जिंकला. आयुष्यभर हेरगिरी हा आपला व्यवसाय इमाने इतबारे करुन त्यांनी अनेकांना मदतच केली. मात्र आजवर कमावलेले नाव त्यांनी स्वताच्याच हाताने खराब करुन टाकले, जेव्हा त्यांना पहिल्यांदा ठाणे पोलिसांनी मोबाईल कॉल्स डेटा अफरातफरीप्रकरणात अटक केली. दोन चार वर्षापूर्वीच्या या आरोपाची व्याप्ती नंतर इतकी वाढली की, रजनी पंडित यांनी आजवर असे अनेक गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. अनेकांचे खासगी संभाषण त्यांनी आपल्या व्यवसायाकरीता टॅप केल्याचे उघड होताच एकच खळबळ माजली होती. अर्थातच अशाप्रकारे सीडीआर फ्रॉड प्रकरणात एखाद्या महिलेने अडकण्याचे महाराष्टÑातील हे पहिलेच प्रकरण नाही.
नोव्हेंबर 2020 मध्ये दिल्लीतील नयती आणि नारायणी या दोन प्रायव्हेट कंपन्यांनी सुमारे 300 कोटींचा गैरव्यवहार केल्याच्या कारणाने सीबीआयने या दोन हेल्थ केयर कंपन्यांचा तपास सुरु केला असल्याची माहिती समोर आली. या दोन्ही कंपन्यांच्या संस्थापक आहेत बहूचर्चित नीरा राडीया. या त्याच राडीया आहेत, ज्यांनी टू जी स्पेक्ट्रम घोटाळयादरम्यान देशभरातील मोबाईल उद्योग जगतातील अनेक उद्योजकांचे खासगी संभाषण टॅÑप केले होते. यात खुद्द उद्योगपती रतन टाटा यांना सर्वोच्च न्यायालयात आपली सफाई द्यावी लागली होती, ही सफाई देताना अभिव्यक्ति स्वांतत्र्य आणि खासगी आयुष्य यावर स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि कायद्यात सुधारणा करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती. कार्पोरेट क्षेत्रात खळबळ माजवणाºया हनी ट्रॅपच्या सर्वात मोठया घटनेतील प्रमुख सूत्रधार राडिया या पुन्हा एकदा सीबीआय आणि ईडीच्या रडारवर आल्या आहेत. नीरा राडीया यांचे नाव 2006 -07 मधील या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा आर्थिक गैरव्यवहारातच पुढे आले आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, राडीया यांच्या कंपन्यांविरोधात 300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. नयती आणि नारायणी यांच्यावर दिल्लीतील हॉस्पिटलमधील योजनांमध्ये 2018 ते 2020 दरम्यान 312.50 कोटी रुपयांचा फेरफार केल्याचा आरोप आहे.
14 जून 2020 या दिवशी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली, ती म्हणजे अभिनेता सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या. या प्रकरणाचा तपास जसजसा सुरु झाला तसतसे यातील वास्तव बीभित्सपणे समोर येवू लागले. सर्वाधिक चर्चेत राहिली ती गोष्ट म्हणजे बॉलिवूड  कलाकार आणि अमली पदार्थांचे नाते. अमली पदार्थाच्या निरंतर अमलाखाली असणारे अनेकजण या गोरख धंद्यात आरपार बुडाले आहेत. या प्रकरणाचा तापस करताना रिया चक्रवर्तीसारख्या अनेक तरुणींचा वापर या व्यवसायात हनी ट्रॅपसारखा होत असल्याचे खुलासे होत राहिले. आजवर सिनेमांतून दिसणारे वास्तव असे ऐन कोरोना कहरमध्ये सामान्यांसमोर आल्याने सगळेच स्तिमित झाले. त्यातच टीआरपीच्या हव्यासापायी चॅनेलवाल्यांनीही आपले उखळ पांढरे करुन एकाचे दहा करत चांगलाच गोंधळ घातला. ‘भीक नको पण कुत्रे आवर ’ असे म्हणण्याची वेळ आली.. तेव्हा कुठे हा तमाशा काही प्रमाणात शांत झाला.
सुशांतसिंग प्रकरणातील आरडाओरड शांत होत नाही तोपर्यंतच अहमदनगरमधील रेखा जरे या सामाजिक कार्यकर्तीची सुपारी देवून हत्या केल्याचे प्रकरण समोर आले. विशेष म्हणजे या हत्येचा सूत्रधार आणि अजूनही फरार असणारा बाळ बोठे नामक आरोपी ही घटना घडेपर्यत एका प्रथितयश दैनिकाचा निवासी संपादक म्हणून कार्यरत होता. 20 मे 2020 रोजी याच बोठेने आपल्या  ‘भविष्यपत्रात’ नगरमध्ये मोठया प्रमाणात सुरु असणाºया हनी ट्रॅपचा लेखाजोखा मांडला होता आणि आपण त्यातले नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण हे सर्वच बोठे यांच्यावर बूमरँगसारखे उलटले आहे. रेखा जरे यांची हत्या हनी ट्रप, ब्लॅकमेलिंग, पैशांची देवाणघेवाण, अनैतिक संबंधातूनच झाल्याचे स्पष्टीकरण खुद्द पोलिसांनीच दिले आहे.
अनैतिक नाते, पैशाची मोठया प्रमाणात होणारा वापर, मानवी तस्करी, माध्यमांचा समावेश, राजकीय, सामाजिक प्रभावी व्यक्ति यांच्याभोवती गुंतले जाणारा हा हनी ट्रॅप आजवर फक्त देशांदेशांमधील सुरक्षा यंत्रणा भेदण्यासाठी वापरला जात होता. आता मात्र सोशल मिडीयाच्या प्रभावी वापरकाळात या ट्रॅपचा वापर करुन झटपट पैसा कमावण्याचा एक मार्गच खुला झाल्याचे दिसते आहे.
नाशिकमध्ये मे, जूनच्या कालावधीत मिलिट्री विभागातील छायाचित्रे संशयास्पदरीत्या टिपताना दोन तरुण पोलिसांना आढळले. या दोघांनी ही छायाचित्रे दिल्लीत राहणाºया एका तरुणीला पाठवली होती. हे दोघेही तरुण बिहारचे आहेत, नाशिकमध्ये कामानिमित्त ते आले होते. काहीच महिन्यांपूर्वी या तरुणीची आणि यापैकी एका तरुणाची फेसबुकवर ओळख झाली. या मैत्रितून आपण नाशिकला जाणार असल्याची माहिती या तरुणाने दिल्यानंतर संबंधित तरुणीने त्याला नाशिकच्या काही ठिकाणांची यादी दिली आणि त्याची छायाचित्रे पाठवून देण्याची आणि आपली मैत्रि सिद्ध करण्याची गळ घातली. याच कारणाने या तरुणांनी ही छायाचित्र टिपली आणि ती संबंधित तरुणीच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठवूनही दिली. आपण हे जे काही करीत आहोत त्यातून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल हे या तरुणांच्या गावीही नव्हते. मात्र जेव्हा पोलीस तपासात त्या तरुणीचा फोनच उपलब्ध नसल्याचे सत्य यांच्या समोर आले तेव्हा त्यांची पाचावर धारण बसली. अजूनही या प्रकरणाची चौकशी सुरुच आहे.
नाशिकच्या या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच पुण्यातून एका उच्चशिक्षित तरुणीला ती ईसिसशी संबधित असल्याच्या कारणावरुन थेट एसआयटीच्या टीमने ताब्यात घेतले. या तरुणीला ताब्यात घेतल्याचे दोन दिवसांनी माध्यमांना कळाले होते. या तरुणीच्या पालकांना अजूनही आपली शिकली सवरलेली मुलगी अस काही करुन इतके पैसे कमावत होती यावर विश्वास बसत नाही.
यापूर्वी महाराष्टÑातील काही ठिकाणांहून अशाप्रकारे देशविघातक कृत्यांत सहभागी असणाºया हनींना पोलिसांनी ट्रॅप केले आहे. नुकतेच उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळणाºया टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी लखनऊ पोलिसांनी टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाºया या टोळीत दोन महिलांसह त्यांच्या तीन साथीदारांचा समावेश आहे.
युद्धजन्य काळात केवळ शत्रूच्या गोटात शिरुन त्याची कमजोरी, गुप्त माहिती मिळवण्याच्या हेतूने हनी ट्रॅपचा सापळा रचला जात होता. यासाठी तरुणींनाच नाही तर तरुणांनाही विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत छुप्या पद्धतीने ही यंत्रणा कार्यरत असते. यासाठी लागणारा पैसाही अवैध मार्गानेच येत असतो. तरुणींचा वाढता सहभाग हा यातला सर्वात मोठा धोका ठरतो आहे. अगदी नगरमध्ये घडलेल्या प्रकरणांतही ज्या महिलांना या कामासाठी वापरले जात होते त्यांना खास प्रशिक्षण दिले जात होते, इतकेच नाही तर त्यांच्या खास दिसण्यावरही पैसा खर्च केला जात असे.
एकीकडे सामाजिक न्यायदान प्रक्रियेत महिलांना संरक्षण देणाºया कायद्यांची निर्मिती संविधानाच्या माध्यमातून झाली आहे. तर दुसरीकडे मिळालेल्या संधीचा गैरवापर करुन घातक कृती करण्याचा अट्टाहास समाजात वाढताना दिसतो आहे. राजकीय हनी ट्रॅपची मर्यादा एखाद्याचे राजकीय अस्तित्व संपवण्यापुरते मर्यादित न राहता त्याचे आयुष्यच संपवण्यापर्यंत पोहोचते तेव्हा यातील दाहकता आणि क्रूरपणा लक्षात घ्यायला हवा.
खरे तर हनी ट्रॅप आणि विवाहबाह्य संबंध या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. हनी ट्रॅप पैशाच्या हव्यासातून जन्माला येते. घराघरात हरवत चाललेला संवाद, नात्यातील अस्पष्टता, अविश्वास दुरावलेली नाती, केवळ स्वार्थासाठी टिकलेली नाती, कुटूंबाची एक चौकट पूर्ण करायची म्हणून जबरदस्तीने टिकवून ठेवलेली नाती, मुलांचे भवितव्य सांभाळायचे म्हणून खपवून घेतली जाणारी नाती आणि या सर्वांचे मानसिक, आर्थिक दडपण यांतूनच अस्तित्वात येणारे विवाहबाह्य संबंध. मोठ्या शहरांतच नाही तर छोट्या गावात आजही दुसरा घरोबा केलेली अनेक उदाहरणे आढळून येतात. काहीजण अत्यंत संयमाने कोणाचेही नुकसान होणार नाही याची आयुष्यभर काळजी घेत अशी नाती सांभाळतातही.
कायदाही अशा नात्यांबाबत संभ्रमात असलेलाच दिसतो. प्रकरणनिहाय कायद्याचे निकालही बदललेले दिसतात. उदा. लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने परवानगी दिली आहे, ही देताना एक सज्ञान जोडपे एकमेकांच्या परवानगीने एकमेकांसोबत राहू शकतात, त्यांच्यामध्ये संमतीने प्रस्थापित झालेले शरीरसंबंध हा बलात्कार किंवा लैंगिक शोषण ठरत नाही, असे म्हटले आहे. दुसºया एका प्रकरणात एखादे सज्ञान जोडपे तीन वर्षांहून अधिक काळ नवरा बायकोच्या नात्याप्रमाणे एकत्रित राहत असेल आणि ते ज्या परिसरात राहतात तेथील रहिवाशी त्यांना नवराबायकोच मानत असतील, त्यांचे नाते त्यांच्या कुटुंबियांनाही मान्य असेल तर त्या महिलेला त्या इसमाची पत्नी म्हणून मान्यता आणि अधिकारही असतील. दुसºया विवाहातून जन्मलेल्या मुलांना वडीलांच्या संपत्तीत हक्क देण्याचा निर्णय देताना ज्या मुलांना हक्क देता त्या मुलांच्या आईचा हक्क का डावलायचा याचे स्पष्टीकरण कायदा देत नाही किंवा तिच्या पालनपोषणाचे काय याचे उत्तर अजूनतरी अधोरेखित झालेले नाही.
समाजातील द्वितीय विवाहाचे सत्य जवळपास 90 टक्के प्रकरणांत पहिल्या पत्नीस, कुटूंबियांना ज्ञात असते. अनेक वर्षे सर्व काही सुरळीत सुरु असते, मात्र अचानक पतीचा मृत्यू ओढवला तर दुसºया पत्नीच्या हक्कावर, तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबईतील एका पोलीसाच्या कुटूंबातील हाच वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे. या पोलीसाने दुसरे लग्न केल्याचे सत्य पहिली पत्नी, तिची मुले यांना ज्ञात होते. जोपर्यंत पती जिवंत होता तोपर्यंत सगळे एकत्रीत होते. मात्र कोरोना नुकसान भरपाईचे 50 लाख रुपये जमा होण्याची वेळ आल्यानंतर या पहिल्या पत्नीने दुसºया पत्नीला आणि तिच्या मुलांना ओळख द्यायलाही नकार दिला. पोलीसाच्या दुसºया पत्नीच्या मुलीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या मुलांचा हक्क अबाधित ठेवत या रकमेतील त्यांचा वाटा त्यांना मिळवून दिला आणि त्यांना मुलांचा दर्जाही. असे अनेक प्रकरणांत घडते.
गंमत म्हणजे देव, धर्म, बुवाबाजी, पोथी पुराण यांचा परमभक्त असणारा आपला समाज देवाची दोनच काय, पण हजारो लग्ने कबूल करतात. शंकर, कृष्ण, गणपती, पाच पांडव या सर्वांनीच एकापेक्षा अधिक विवाह केल्याचे दाखले पोथ्यांपुराणात, मालिकांमधून मान्य केले जातात. मग काही अपरिहार्यतेतून आपल्या घरात निर्माण होणारी ही नाती अंगवस्त्र, रखेल, ठेवलेली बाई, दुसरा घरोबा अशा अपमानास्पद नावाने मनाच्या आणि घराच्या बाहेर हद्दपार केली जातात, असे का बरे व्हावे? अशा कितीतरी जणी आहेत ज्या महिलांनी केवळ प्रेमापायी आपल्या आवडत्या पुरुषाच्या घराची आधारवड म्हणून उभा जन्म जाळला, पण म्हणून तिच्या पदरातले निखारे निमाले नाहीत, अशांची दखल घ्यायचीच नाही का ? कोणत्याही नात्यात तिची एकटीचीच चूक कशी काय असू शकते याचा विचार आपण कधी करणार?
मुळातच एकीकडून दुसरीकडे वळण्याचा निर्णय एका रात्रीत, एका दिवसांत होत नसतो. कोणतेही नाते एका रात्रीत आकाराला येत नाही. काही नाती आपसुक जुळून येतात, तर काही जुळून यावीत यासाठी प्रयत्न केले जातात. जे नाते केवळ शारीरिक आकर्षणाचा केंद्रबिंदू असते ते काही तासांत, काही दिवसांत संपुष्टातही येते. पण ज्या नात्याने जबाबदाºया स्वीकारलेल्या असतात, समाज मान्यतेच्या पलीकडे जावून काही धाडसी निर्णय घेतलेले असतात. हे करताना कोणीही दुरावले जाणार नाही, कोणाच्याही आयुष्यातला मान सन्मान, आर्थिक गणित विस्कळीत होणार नाही याची जपणूक केलेली असते.
अशाप्रकारे वर्षानुवर्षे जपलेली नाती मी अनुभवलेली आहेत. म्हणूनच मला पुन्हा पुन्हा वाटते की कायद्याने आपल्या व्याख्या नव्याने करण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या नात्यात भरडल्या जाणाºया महिलांच्या सन्मानाचा आणि किमान सुरक्षित जगण्याचा विचार व्हायलाच हवा. अन्यथा लैंगिक आणि आर्थिक शोषणाचा तो एक निर्धोक मार्ग बनेल. नातं मग ते कोणतेही असो त्याला कायदेशीर आश्रय मिळायलाच हवा, असे झाले तरच समाजातील ही अस्वस्थता, शोषण काही प्रमाणात कमी होईल. नात्याची कायदेशीर बांधिलकी जोपर्यंत अपरिहार्य होत नाही तोपर्यंत पे्रमाच्या नावाखाली शोषणच वाट्याला येईल. कधी ते स्त्रीचे असेल, तर कधी पुरुषाचे, दोघांसाठीही ते घातकच आहे.
शेवटी काय ‘‘पे्रम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं…’’ त्यामुळे प्रेमाच्या गावाला जाणाºया सर्वांनाच व्हँलेटाईनचा आशीर्वाद मिळो आणि प्रेमात पडलेल्या सर्वांचीच कहाणी सुफळ संपूर्ण होवो, हीच सदिच्छा…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button