राजकारण

ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

ठाणे : ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे सोमवारी निधन झाले. दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु सोमवारी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत १९९२ रोजी अनंत तरे हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून राबोडीतून निवडून आले होते. त्यांनी ३१ मार्च ९३ साली प्रथम ठाणे महापालिकेचं महापौरपद भूषवलं. त्यावेळी ११ अपक्ष नगरसेवक निवडून आल्याने प्रबळ असणाऱ्या व्यक्तीला महापौर पदाची उमेदवारी देणे गरजेचं असल्याने शिवसेनेतून अनंत तरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर ९४ आणि ९५ साली असे सलग तीनवेळा त्यांनी महापौरपद भूषवलं होतं. ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे.

१९९७ साली शिवसेनेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या उपनेतेपदावर त्यांची वर्णी लागली होती. त्यानंतर २००० साली विधानपरिषदेची आमदारकी त्यांना देण्यात आली होती. तर २००६ साली विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून त्यांना डावलून नारायण राणें समर्थक रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले होते.

अनंत तरे यांनी कोपरी -पाचपांखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवत भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण अवघ्या २४ तासांत मातोश्री वर बोलवून घेत पक्षप्रमुख उध्द्व ठाकरे यांनी नाराजी दूर केल्यावर उमेदवारी मागे घेत ते पुन्हा शिवसेनेत कार्यरत झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button