गुरुग्राम: गेल्या तीन महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. तिन्ही कायदे मागे घ्या ही या आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांना संभ्रमित करण्यात आल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. मात्र आता एका व्हिडीओमुळे भाजप अडचणीत आला आहे.
हरयाणात कृषी कायद्यांबद्दल संवाद साधण्यासाठी भाजपकडून एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तळागाळातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. ‘कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आमचं ऐकायला तयार नाहीत. कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ दिल्या जाणाऱ्या तर्कांच्या आधारावर ते बोलत नाहीत. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करावा लागेल,’ असं भाजपचा एक कार्यकर्ता व्यासपीठावरील नेत्यांना सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
गुरुग्राममध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला भाजपचे हरयाणा युनिटचे प्रमुख ओ. पी. धनखड, क्रीडा मंत्री संदीप सिंह आणि हिसारचे खासदार बृजेंद्र सिंह उपस्थित होते. त्यांच्या समोर एका भाजप कार्यकर्त्यानं शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची गरज असल्याचं म्हटलं. हा व्हिडीओ काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केला आहे. सुरजेवाला यांनी व्हिडीओ शेअर करताना भाजपवर निशाणा साधला आहे.
‘भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे नेते आणि मंत्र्यांना भेटत आहेत. शेतकऱ्यांना कसं मूर्ख बनवायचं याबद्दल ते विचारणा करत आहेत. भाजपकडून दिले जाणारे तर्क शेतकऱ्यांना पटत नाहीत हे यातून स्पष्ट होतं. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, जो शेतकऱ्यांना दिसत नाही,’ असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्लीच्या वेशीवर नोव्हेंबरच्या अखेरपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघालेला नाही.