राजकारण

इंधनदरवाढीच्या निषेधार्थ रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून गाठले ऑफीस

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात सलगपणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली. देशातील काही भागात पेट्रोलने शंभरी गाठली असून, डिझेलही उच्चांकी दरावर पोहोचले आहे. तर, दुसरीकडे गॅसच्या किमती वाढल्याने सामान्यांच्या समस्यांचा गुणाकार होत आहे. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने विरोध प्रदर्शन होत असताना रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून आपले ऑफीस गाठत इंधनदरवाढीला विरोध दर्शवला आहे.

दिल्लीतील खान मार्केट ते कार्यालय हे अंतर रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून कापले. यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ”पंतप्रधान मोदींनी वातानुकुलित आरामदायी वाहनातून बाहेर पडावे आणि सामान्य जनतेच्या समस्या, अडचणी समजून घ्याव्यात, असे टोला लगावत सर्वसामान्य जनतेला होत असलेला त्रास पाहून तरी पंतप्रधान इंधनदर नियंत्रणात आणतील, अशी अपेक्षा वाड्रा यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी मागच्या सरकारवर खापर फोडून मोकळे होतात, असा आरोपही वाड्रा यांनी केला.

काँग्रेस नेत्यांचीही सायकलस्वारी
मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेत्यांनीही विधानसभेपर्यंत सायकलवरून प्रवास केला आणि इंधनदरवाढीविरोधात प्रदर्शन केले. काँग्रेस नेते पीसी शर्मा, जीतू पटवारी आणि कुणाल चौधरी यांनी सायकलवरून विधानसभा गाठले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सायकल चालवून विरोध दर्शवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button