आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आणि कोरोनाची लक्षणे दिसल्यास चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहे.
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. दिवसभरात ३ हजारापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.