अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच संजय राठोडांची गच्छंती?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. शिवसेना लवकरच संजय राठोड यांच्या बद्दल निर्णय घेईल असं सांगण्यात येत आहे, शक्तीप्रदर्शनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असल्याची माहिती आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४८ तासापूर्वी उद्धव ठाकरेंनी गर्दी न करण्याचं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं, परंतु त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्याने गर्दी करून सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अद्यापही संजय राठोड प्रकरणावरून राजकीय वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाही, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यापासून ते १५ दिवस गायब झाले होते, त्यानंतर अचानक त्यांनी पोहरादेवी गडावर येऊन शक्तीप्रदर्शन करून त्यांची बाजू मांडली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि कोरोना काळात हजारोंच्या संख्येने जमवलेली गर्दी या दोन्ही कारणामुळे संजय राठोड अडचणीत आले, विरोधकांना ऐन अधिवेशनाच्या काळात ठाकरे सरकारला घेरण्यासाठी आयती संधीच सापडली, त्यामुळे संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
यातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पोहरादेवी गडावरील गर्दीवर नाराजी व्यक्त केली आहे, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत चर्चा झाल्याचंही सांगण्यात येत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे असं बजावलं असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता आहे, संजय राठोडांची १ मार्चपूर्वी गच्छंती होण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे, एकीकडे विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे मित्रपक्षही संजय राठोड प्रकरणावरून नाराज असल्याची माहिती आहे.
संजय राठोड यांचा अधिवेशनापूर्वी राजीनामा ही बातमी मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमात पेरून सुसंस्कृत राजकारणाचा बुरखा पांघरण्याचा प्रयत्न केला आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असं लॉजिक यामागे आहे असा टोला भाजपाने ठाकरे सरकारला लगावला आहे. एखाद्या मंत्र्यांनी राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वाट पाहण्याची गरज नाही, ते कधीही मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करू शकतात, परंतु काहीही करायचं नाही आणि सुसंस्कृतपणाचा बुरखा कायम ठेवायचा हा त्यातला प्रकार आहे, जोपर्यंत संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी दिला आहे.
“मंत्री वाचला पाहिजे, राज्यातील गोरगरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील,” असे म्हणत सरकारच्या धोरणावर भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही. राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल पाठवला. वनमंत्री संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे या अहवालाला अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन केलेल्या पोहरादेवी येथील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये महंत कबीरदास महाराज व त्यांच्या कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. शिवाय गावातून गुरुवारी तब्बल १२३ जणांचे नमूने चाचणीसाठी गेले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
संजय राठोड प्रकरणासह इतरही प्रकरणांमध्ये विरोधी पक्ष नेहमीच आक्रमक राहील असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी सरकारला दिला आहे. उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली, तसेच नियम फक्त विरोधकांनाच आहेत का?, सत्ताधाऱ्यांना नाहीत का? असा सवाल करत टीकास्त्र सोडलं आहे.