राजकारण

अशिक्षित नागरिक देशावरील मोठे ओझे : अमित शाह

नवी दिल्ली : अशिक्षित लोक हे देशावरील मोठे ओझे आहे. ते कधीही चांगले नागरिक बनू शकत नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, राज्यघटनेने आपल्याला काय अधिकार दिले आहेत किंवा कोणती कर्तव्ये बजावायला सांगितली आहेत, याची अशिक्षित माणसाला काहीही कल्पना नसते.

नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्याच्या घटनेस २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाह यांची मुलाखत घेण्यात आली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, त्यावेळी गुजरातमध्ये एक मोठी समस्या होती ती म्हणजे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण खूपच मोठे होते. त्यावेळी आम्ही शाळेत पटनोंदणी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जोमाने प्रयत्न केले. त्यानंतर शाळेत १०० टक्के पटनोंदणी करण्यात गुजरात सरकार यशस्वी झाले होते.

अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या कारकिर्दीत राज्यातल्या शाळांत विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून १ टक्क्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते आहेत. सध्या ज्या लोकशाही पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका होतात, तशा त्या याआधी कधीही झाल्या नव्हत्या, हे मोदी यांचे टीकाकारही मान्य करतील. मोदी हे हुकूमशहा आहेत, या टीकेत काहीही तथ्य नाही. शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे. ते प्रत्येकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात, मोदी शिस्तप्रिय आहेत. देशात परिवर्तन घडविण्यासाठी जनतेने सत्ता दिली आहे. फक्त सरकार चालविण्यापुरते हे अधिकार आपल्याला दिलेले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे.

अमित शाह म्हणाले की, भाजपला आवडण्याची शक्यता नाही, असेही निर्णय घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. काळा पैसा खणून काढताना, आर्थिक सुधारणा करताना, करचुकवेगिरीचे सर्व मार्ग बंद करताना काही लोकांना त्रास हा होणारच. पण त्याचा विचार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रहितासाठी योग्य तोच निर्णय घेतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button