

मी आणि विवेकानंद आम्ही दोघे चेंबरचे शेजारी असलो तरी उत्तम मित्र आहोत. २००३ मध्ये आम्ही एकत्रित चेंबर घेतल्यापासून आमच्यातील संपर्क वाढला. मी नियमितपणे १९९७ ते २०१२ पर्यंत नाशिक वकील संघाच्या मॅचेस खेळत होतो. विवेकानंदने २००४ पासून वकील संघामध्ये खेळायला सुरुवात केली. त्याने २०१२ मध्ये पहिल्यांदा नाशिक वकील संघाच्या मॅचेस घेतल्या आणि त्याची त्यातील रुची वाढली. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये झोकूनच दिले. साधारण २०१२ पासून माझ्या व्यावसायिक व्यापामुळे माझे क्रिकेट खेळणे कमी झाले, पण बंद झाले नाही. जस जसे वकिलांचे संघ सामने खेळू लागले तस-तसे विवेकानंदने लिडरशीप करण्यास सुरुवात केली. त्यातल्या खुबी समजावून घेत, सर्वांना सामावून घेतले. फक्त नाशिकच नाही, तर नाशिकच्या बाहेरही वकिलांचे संघ स्पर्धेकरीता जावू लागले. प्रसंगी संपूर्ण टीमचा खर्च विवेक करीत असे. २००४ पासून विवेकचा क्रिकेटमधील चढता क्रम आणि त्याने मिळवलेले यश पाहता त्याने नाशिक वकील संघ आणि क्रिकेटला उत्तरोतर बहरत नेले, हे मान्यच करावे लागेल. यंदा ‘एमएपीएल २०२४’चे यजमानपद नाशिकला मिळते आहे आणि त्याचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूतींच्या उपस्थितीत होते आहे, हा तर विवेकने रचलेला क्रिकेटचा कळसाध्यायच मानावा लागेल. एक मित्र म्हणून तो मला अधिक जवळचा आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती तो तडीस नेतो. त्यासाठी कितीही अडचणी आल्या, टीका झाली तरी… मग ती वकिलीतील एखादी केस, दावा असो वा क्रिकेटचे आयोजन.. येनकेन प्रकारे तो ते आव्हान पूर्ण करतोच. टीम बांधणीत त्याचा हातखंडा आहे. एकदा स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करणे हा त्याचा स्वभाव आहे. त्याने स्वत:च्या मेहनतीने नाशिक वकील संघाला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे. या माध्यमातून वकील घडवण्यासोबतच त्याने चांगले क्रिकेटर्स नाशिक वकील संघात घडवले आहेत. एक मित्र या नात्याने हा त्याचा प्लस पॉईंट आहे असे मला वाटते.