
मुंबई : क्रुझ पार्टीवर धाड टाकून एनसीबीनं ८ जणांवर अटकेची कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यालाही अटक झाली आहे. सध्या आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये कैदेत आहे. परंतु या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
मागील अनेक दिवसांपासून एनसीबी विरुद्ध नवाब मलिक असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात आता नवाब मलिकांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे. कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? याबाबतचा तपशील लवकरच येथे उघड करेन असं सांगत मलिकांनी फ्लेचर पटेलचा एक फोटो ट्विटमध्ये जोडला आहे या फोटोत एक महिलाही दिसत आहे. नेमकं हा व्यक्ती कोण याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. फ्लेचर पटेल हा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या ओळखीतला असल्याचं म्हटलं आहे.
फ्लेचर पटेल या व्यक्तीला तीन केसमध्ये साक्षीदार बनविण्यात आले. कौटुंबिक मित्र कसा स्वतंत्र साक्षीदार बनू शकतो. या फ्लेचरचे वानखेडे यांच्या निकटवर्तीय असलेल्या महिलेसमवेत फेसबुकवर फोटो, त्यावर ‘विथ लेडी डॉन’ म्हणून फोटो कँप्शन लिहिलं आहे. वानखेडे हे खोट्या केसेस करुन बॉलीवूडला दबाव टाकतात हे स्पष्ट झाले. एनसीबीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन फ्लेचर पटेल, लेडी डॉन यांचा आणि कौटुंबिक मित्र असलेल्या एकाच व्यक्तीला तीन केसेस मध्ये का स्वतंत्र साक्षीदार बनविण्यात आले? याचा खुलासा करण्याचे आव्हान मलिकांनी दिले आहे.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने एकूण ११ जणांना ताब्यात घेतले होते. मग यातील तिघांना कुणाच्या निर्देशावरून सोडण्यात आले, असा प्रश्न नवाब मलिकांनी उपस्थित केला होता. मलिक म्हणाले होते की, क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर टाकलेल्या छाप्यात एनसीबीने ११ जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. मात्र, अवघ्या तीन तासांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांना सोडण्यात आले. एनसीबीने कुणाच्या निर्देशावरून या तिघांना सोडले? आम्ही एनसीबीकडे यासंदर्भात सत्य काय, याचा खुलासा करण्याची मागणी करत आहोत. समीर वानखेडे आणि भाजप नेते यांच्यात काही चर्चा झाली असावी, असे आम्हाला वाटते, असेही मलिक यांनी दावा केला होता.
एनसीबीनं दावा फेटाळला
दरम्यान, क्रूझवर २ ऑक्टोबरला टाकलेला छापा आणि कारवाई ही कायदेशीर नियमांनुसारच होती. छाप्यादरम्यान १४ जणांना कलम ६७ च्या नोटिशीनुसार ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पुराव्याच्या आधारे त्यातील ८ जणांना अटक केली होती, तर इतरांना पुराव्याअभावी सोडण्यात आले होते. एनसीबीने एकही नियम मोडलेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा आहे असल्याचं सांगत एनसीबीने नवाब मलिकांचा दावा फेटाळला.
वानखेडे यांच्या बहिणीचे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांच्या या प्रश्नांना आता समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलंय. कॅबिनेत मंत्री असं अनव्हेरिफाईड स्टेटमेंट देत आहेत. काही स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपटच सेनेत उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय स्टेटसचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला, असं आव्हान यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिकांना दिलंय.
कुणाला बदनाम करण्याचं काम आम्ही करत नाही. आमचे नातेवाईक जर येत नसतील तर आमची चूक आहे का? जे कर्मठ आहेत. जे चांगलं काम करत आहेत. त्यांना बदनाम करु नका, असंही यास्मिन वानखेडे म्हणाल्या. इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी भविष्यात असे आरोप केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार, कायदेशीर नोटीस पाठवणार असा इशाराही त्यांनी दिलाय.
फ्लेचर पटेल यांचे मलिकांना प्रत्युत्तर
दरम्यान, मलिक यांनी फ्लेचर पटेल यांचंही नाव घेतलं होतं. त्यानंतर पटेल यांनी मलिकांच्या दाव्याला उत्तर दिलं आहे. मी एक माजी सैनिक आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे हे खूप मोठं आणि चांगलं काम करत आहेत. म्हणून सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून वानखेडे यांनी एनसीबीला मदत करत असतो. देशात ड्रग्स आणून तरुण पिढीला ड्रग्स अॅडिक्ट केलं जात आहे. ते रोखण्याचं काम एनसीबी करत आहे. म्हणून मी त्यांना मदत करत आहे, असं फ्लेचर पटेल यांनी म्हटलंय.




