Top Newsस्पोर्ट्स

टी-२० विश्वचषक : इंग्लंडचे वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व; ६ गडी राखून विजय

दुबई : कॅरेबियन बेटांवरील लहरी वाऱ्यांप्रमाणे वेस्ट इंडिजचा खेळ दिसला. इंग्लंडच्या गोलंदाजांना फक्त तो लहरीपणा ओळखून त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका चोख पार पाडली. मोईन अली व आदिल राशिद यांनी ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना विंडीजचा डाव ५५ धावांवर गुंडाळला. इंग्लंडच्या फलंदाजांनी हे लक्ष्य सहज पार करून २०१६च्या फायनलमधील पराभवाची सव्याज परतफेड केली. इंग्लंडनं ८.२ षटकांत ४ बाद ५६ धावा करून ६ गडी राखून वेस्ट इंडिजवर विजय मिळविला.

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् मोइन अलीनं कर्णधार इयॉन मॉर्गनचा हा निर्णय योग्य ठरवला. चेन्नई सुपर किंग्सच्या अष्टपैलू खेळाडूनं गोलंदाजीत छाप पाडताना पहिल्या ३ षटकांत २ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला जबरदस्त दणके दिले. ख्रिस वोक्सनं दुसऱ्या षटकात विंडीजचा सलामीवीर एव्हिन लुईसला ( ६) बाद केले, लुईसनं टोलावलेला उत्तुंग चेंडू मोईन अलीनं सुरेखपद्धतीनं झेलला. त्यानंतर मोईन अलीनं गोलंदाजीत कमाल दाखवताना लेंडल सिमन्स ( ३) व शिमरोन हेटमायर ( ९) यांना बाद करून गतविजेत्यांचे कंबरडे मोडले. मोईन अलीनं ४ षटक, १ निर्धाव, १७ धावा, २ विकेट्स अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली.

हे धक्के कमी होते की काय, टामल मिल्स, ख्रिस जॉर्डन व आदील राशीद यांनीही विंडीजची अवस्था वाईट केली. राशिदनं आंद्रे रसेलची घेतलेली विकेट पाहण्यासारखी होती. एकमेव ख्रिस गेल (१३) दुहेरी धावसंख्या गाठू शकला. कर्णधार किरॉन पोलार्ड (६) एकटा खिंड लढवेल असे वाटत असताना राशिदनं त्यालाही फिरकीच्या जाळ्यात ओढले. राशिदनं अखेरची विकेट घेत विंडीजचा संपूर्ण संघ ५५ धावांवर माघारी पाठवला. राशिदनं २ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही तिसरी निचांकी धावसंख्या ठरली.

जेसन रॉय व जोस बटलर ही जोडीच हे माफक लक्ष्य पार करेल, असे वाटत होते. पण, रॉय ११ धावांवर माघारी परतला, त्यानंतर आलेला जॉनी बेअरस्टो ९ धावा करून बाद झाला. रवी रामपॉलनं इंग्लंडच्या रॉयला ख्रिस गेलकरवी झेलबाद केले आणि गेलचा हा ट्वेंटी-२०तील १०० व झेल ठरला. अकील होसैननं त्याच्याच गोलंदाजीवर बेअरस्टोची कॅच टिपली. मोईन अलीही उगाच घाई करून ३ धावांवर धावबाद झाला. विंडीज पराभवाच्या उंबरठ्यावर असताना होसैननं एक अफलातून झेल घेतला. लाएम लिव्हिंगस्टोन ( १) स्वस्तात माघारी परतला. होसैननं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. इंग्लंडनं हा सामना ६ विकेट्स राखून सहज जिंकला. बटलर २४ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं ८.२ षटकांत ४ बाद ५६ धावा केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button