Top Newsराजकारण

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित; ओबीसी आरक्षणाचा वाद तुर्तास टळला

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. राज्य सरकारनं कोरोनाचं कारण देत पोटनिवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात ६ जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणुका स्थगित केल्याची माहिती दिली आहे.

सरकारला ओबीसी आरक्षणात काहीच रस नाही. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन चतुर्थांश निवडणुका होणार आहेत. तिथपर्यंत जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतर मिळूनही पुढील सात वर्षे काही फायद्याचे ठरणार नाही. यामुळेच, सरकार फक्त चालढकलपणा करत आहे. त्यांना फेब्रुवारी २०२२ पर्यंत फक्ट टाईमपास करायचा आहे. पण, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई सुरूच राहणार असल्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button