मुख्यमंत्रीपद ५ वर्षे शिवसेनेकडे राहणार : संजय राऊत

नाशिक: आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन संभ्रम निर्माण झाला आहे का? अशी चर्चा आता पुन्हा जोर धरु लागली आहे. त्याला कारण आहे. संजय राऊतांचं सामनातलं रोखठोक सदर आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा नाशकात दिलेलं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि तसं ठरल्याची राज्यात जोरदार चर्चा आहे. पण, असं काहीच ठरलेलं नसून आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद पाच वर्ष शिवसेनेकडेच राहणार असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत हे सध्या खानदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच भाग म्हणून ते नाशकातही पक्षाच्या बैठका घेत आहेत. अशाच एका बैठकीनंतर दुपारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात एका पत्रकारानं प्रश्न विचारला की, आघाडीत सत्तेचा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलेला आहे का? त्यावेळेस राऊत म्हणाले की, ‘मी रोखठोकमध्ये सत्तेच्या फॉर्म्युल्याबद्दल लिहीलेलं नाही. तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष राहील. यामध्ये कुठल्याही वाटाघाटी नाहीत. ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसा इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्णकाळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशा प्रकारची कमिटमेंट सुरुवातीपासून झालेली आहे. आणि मला असं वाटतं, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा जाहिरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे’.
शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे राहील असा शब्द आहे असं संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात लिहीलेलं आहे. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी नाशकात केला. राऊतांना पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असं सांगण्याची पुन्हा पुन्हा वेळ का येत आहे? भाजपासोबत जसा शब्द देण्याघेण्यावरुन शिवसेनेचा वाद झाला होता तसाच वाद तो आता राष्ट्रवादीसोबत तर होणार नाही ना अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
पवारांच्या बोलण्यातही संभ्रम?
संजय राऊत नाशकात म्हणाले की, शरद पवारांनीही पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री याबद्दल भाष्य केलेलं आहे. राऊतांचा रोख हा शरद पवारांच्या भाषणातल्या शेवटच्या चार ते पाच ओळींबद्दल आहे. ज्यात ते म्हणतात की हे सरकार पाच वर्ष काम करेल. पवार कुठेही असं म्हणालेले दिसत नाहीत की पाच वर्षे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल ज्याचा दावा राऊत करत आहेत. उलट शिवसेना शब्दाला कशी पक्की आहे हे आवर्जून पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळेच शिवसेनेचा शब्द देण्याघेण्यावरून भाजपसोबत जो वाद झाला होता तो इथं राष्ट्रवादीसोबतही होतोय की काय? अशी चर्चा आहे. शरद पवार जोपर्यंत पाच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच हे जोपर्यंत स्पष्टपणे सांगत नाहीत तोपर्यंत शिवसेनेची अडचण कायम आहे.




