
मुंबई : मुंबईमध्ये वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के लोकांचे घटस्फोट होतात, असा दावा करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. आता ‘छोटे राजा साहेब, ह्या पेक्षा मोठी comedy काय होऊ शकते’ असं म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. ‘छोटे राजा साहेब,ह्या पेक्षा मोठी comedy काय होऊ शकते की No.1-CM च्या शहराला Int Co.TomTom च्या Traffic Index Report मधे-City with World’s Worst Traffic’ चा No.1 क्रमांक दिला गेला आहे’ असा दावाच फडणवीस यांनी केला आहे. तसंच, ‘जगात सर्वाधिक- ६५ टक्के Congestion level असल्यामुळे मुंबई दरवर्षी ४१,००० कोटींपेक्षाचे आर्थिक नुकसान सोसत आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला होता.
‘जेव्हा मी काही बोलते तेव्हा तुम्ही हे विसरुन जा की देवेंद्र फडणवीस यांची बायको म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. मला दिसतं की, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते, खड्ड्यांमुळे किती त्रास होतो. आज मुंबईत ट्रॅफिक जाम मुळे तीन टक्के घटस्फोट होतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे खड्ड्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार नाहीत का? असा दावा फडणवीसांनी केला होता.
अजब जावईशोध, किशोरी पेडणेकरांनी उडवली खिल्ली
अमृता फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले, ‘ऐकावे ते नवलं… आज तर फारच मोठा जावईशोध लावला आहे की तीन टक्के घटस्फोट मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे होतात. त्यांच्यावर आता हसावं की रडावं? अशी खिल्ली पेडणेकर यांनी उडवली होती.
‘कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवणारच असं सुरू आहे. अमृता फडणवीसांसह इतरानाही जो त्रास होत आहे तो खूपच वेगळा आहे. त्यामुळे मुंबईला नेहमीच बदनाम करण्याचं काम भाजप करते. मुंबईकर या करमणुकीच्या कामाला कंटाळले आहेत. अशा वक्तव्यांमुळे मुंबईची बदनामी होते. वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होतात हा जावईशोध भयानक आहे’ असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.




