राजकारण

राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री ‘वर्षा’वर; अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहे. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत आहे.

अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मात्र अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती केली आहे. याशिवाय त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे, त्याला ईडीने परवानगी दिली आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीअंती अटक केली तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल. सरकारचं डॅमेज कंट्रोल, ईडी चौकशीला कसं सामोरं जायचं, या सर्व पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची चर्चा होऊ शकते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. संजय राऊत काल वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. तीन दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं झाली. या चर्चेनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.

चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या गेल्या २-३ दिवसांपासून मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यावरील भेटी वाढल्याचं पाहायला मिळालं. हाच धागा पकडत भाजपच्या नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे राऊत यांच्या येरझाऱ्यांवरुनच पाहायला मिळत असल्याची खोचक टीका वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलीय.

संजय राऊतांच्या अस्वस्थेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्या करण्यावरून दिसतचं आहे. एकच कोडं, कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना, ‘मी हरामखोर नाही’, हे कशाला सिद्ध करावं लागतंय? संजयजी, माझं एकच आवाहन आहे की, तुम्ही सहा आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं, असं ट्वीट करुन वाघ यांनी संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तसंच पावसाळी अधिवेशनावरुन थेट आव्हानही दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button