छोटा राजनच्या नावे ५० लाखांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीला अटक

पुणे : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुतणी असल्याचं सांगून एकाला ५० लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या प्रियदर्शनी निकाळजे या तरुणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिचा साठदार धीरज साबळे याला पोलिसांनी २५ लाखाची खंडणी घेताना रंगेहात पडकलं होतं. आपण राजकीय पक्षाची जिल्हाध्यक्ष आहे असं सांगत जीव प्यारा असेल तर ५० लाखाच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली होती.
खंडणीचं हे प्रकरण २०२० मधील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रियदर्शनी निकाळजे हिने मार्च २०२० मध्ये एका व्यक्तीला ५० लाख रुपयाची खंडणी मागितली होती. आपण एका राजकीय पक्षाची जिल्हाध्यक्ष आहोत. तसंच छोटा राजनची पुतणी आहे. आमचा डीएनएही एक आहे. तुला जीव प्यारा असेल तर ५० लाख रुपये दे, अशी धमकी निकाळजेनं दिली होती. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सापळा रचून २५ लाखाची खंडणी स्वीकारताना धीरज साबळे याला रंगेहात पकडलं होतं. मात्र, मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे मात्र फरार होती.




