Top Newsराजकारण

मुख्यमंत्र्यांवरील नारायण राणेंच्या टीकेला अजितदादांचे रोखठोक उत्तर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलं. काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती, असं अजित पवार म्हणाले.

ते लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यात फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही उपस्थित का नाही असा सवाल केला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन नारायण राणेंनी ‘तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका’ अशी भाषा वापरली होती.

याबाबत अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला घटनास्थळी जाण्याचा अधिकार आहे, मात्र व्हीआयपी व्यक्तींनी कलेक्टर पाहिजे, अधिकारी पाहिजे असा आग्रह धरू नये. – जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना कामं करण्याची मुभा मिळाली पाहिजे. इतर नेत्यांना दौरा करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही आता नोडल ऑफिसर ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button