राजकारण

बंगालचा गड जिंकला, पण ‘वाघीण’ हरली! नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव

कोलकाता: देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. याआधी ममता बॅनर्जी यांचा १२०० मतांनी विजय मिळवला असल्याबाबत एएनआयनं माहिती दिली होती. त्यामुळं ममता यांचा विजय झाला असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड जिंकला, पण ‘वाघीण’ हरली अशी स्थिती झाली आहे.

ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही २२१ हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.

ममता यांच्या पराभवानंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी देखील ट्वीट केलं आहे. काही मोठ्या लढाया जिंकण्यासाठी बलिदान तर द्यावंच लागतं, असं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे तृणमूलनं ट्विट करत म्हटलं आहे की, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कृपया अंदाज काढू नका.

ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला असला तरी पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असंच दिसतंय. नंदीग्राममध्ये सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सुरुवातीला भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत २७०० मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर लगेचच शुभेन्दु अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले. नंदीग्राममधील मतमोजणीमुळे क्षणाक्षणाला अनेकांचा काळजाचा ठोका चुकत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button