कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह; भारत-श्रीलंका दुसरा टी-२० सामना स्थगित

कोलंबो : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या टी-२० सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं १-० अशी आघाडी घेतली आहे आणि आजच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून श्रीलंका मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण, आज होणारा हा सामना स्थगित करावा लागला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यामुळे आजचा होणारा सामना बुधवारी होण्याची शक्यता आहे.
कृणालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विलगीकरणात जावं लागलं आहे. या सर्वांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना विलगीकरणातच रहावे लागणार आहे. कृणाल पांड्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यामुळे दुसरा टी-२० सामना स्थगित करावा लागत आहे. अन्य खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास हा सामना बुधवारी खेळवण्यात येईल. सध्या सर्व खेळाडू विलगीकरणात आहेत, असे सांगण्यात आले.
पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा इंग्लंड दौरा अडचणीत?
कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा इंग्लंड दौरा अडचणीत येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयनं सोमवारीच या दोन्ही खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड केल्याचे जाहीर केले. कृणालच्या संपर्कात टीम इंडियाचे ८ खेळाडू आले होते आणि त्यामध्ये पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचाही समावेश आहे. त्यामुळे या दोघांचा इंग्लंड दौराही संकटात आला आहे. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांना बदली खेळाडू म्हणून बीसीसीआयनं पृथ्वी व सूर्यकुमारची निवड केली.




