
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी सुरू आहे. कोणी भ्रष्टाचार करत असेल आणि यंत्रणांना माहिती मिळत असेल तर चौकशी करू नये का? त्या संस्था कशासाठी आहेत? त्यांनी जे काम केलं. त्यात काही सापडलंच ना. संपूर्ण आयुष्यभर नोकरी केली तर पाच दहा लाखाच्या पलिकडे मिळत नाहीत. हे लोकं कोटीत खातात, घेतात आणि ठेवतात. त्यामुळे पकडले गेले. चोरी केल्यानंतर सर्वच जण बोंब मारतात. मी काहीच केलं नाही सांगत असतात. अरे चोरी केली की नाही ते सांगा ना? असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केला. दरम्यान, अनिल देशमुख यांच्यानंतरही अजून अनेक जण लाईनमध्ये आहेत. तुरुंग खाली करण्याचं काम सुरू आहे. सर्वजण येतील हळूहळू असा दावाही त्यांनी केला.
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळाला. यावेळी राणे म्हणाले, अनेक दिवसानंतर मी माध्यमांसमोर आलो आहे. मागील काही दिवसांपासून काही लोकांचे फटाके ऐकत होतो. पोटनिवडणुकीत एक अपक्ष आमदार जिंकला आणि शिवसेनेनं त्याचा डंका वाजवायला सुरुवात केली. मी त्या उमेदवाराची निशाणी पाहिली, त्यात बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज आहे. पण, शिवसेनेला उगाचच दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय लागलीय, असा टोला राणेंनी लगावला. दादरा नगर-हवेलीमध्ये यापूर्वी मोहन डेलकर सातवेळा निवडून आले होते. आता त्यांची पत्नी निवडून आली. यामध्ये शिवसेनेचा कोणताही वाटा नाही. तिथे शिवसेनेचा साधा शाखाप्रमुखही नाही. पण निवडणूक जिंकल्यानंतर श्रेय घेण्यासाठी शिवसेना सर्वात पुढे नाचत आहे. काही काळाने कलाबेन डेलकर भाजपमध्ये येतील तेव्हा शिवसेनेने बोंबलत बसू नये, असे नारायण राणे यांनी म्हटले.
राणे पुढे म्हणाले की, संजय राऊतांचे अग्रलेख वाचत होतो, कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही ३०३ पेक्षा अधिक आहे, तुम्ही एकने धडक मारणार ? संजय राऊत सरकलेला माणुस आहे. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. आता तुमचे ५६ आमदार आहेत, ते मोदींमुळेच निवडून आलेत. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असंही राणे यावेळी म्हणाले.
नारायण राणेंनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांचे कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
मुख्यमंत्री राणेंच्या कानात काय बोलले ?
चिपीच्या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नारायण राणे यांच्या कानात बोलताना सर्वांनीच पाहिले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे नेमक काय बोलले हे मला लक्षात आले नाही. त्यामुळे मी पुन्हा त्यांना विचारले की तुम्ही नेमक काय बोललात ? त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भांडी आणलीत की नाही ? भांडाफोड करणार आहात ना ? या वक्तव्यानंतर मी चिडलो. मनात ठरवलच की आता भांडाफोड करायचीच. माझ्या भाषणातून मला जे बोलायच होते ते मी बोललोच. कार्यक्रमात मी चिडण्याचे कारणच मुख्यमंत्र्यांनी डिवचल्याचे कारण असल्याचे राणेंनी स्पष्ट केले.
मलिक दुसऱ्यांच्या बेडरुममध्ये जातातच कशाला?
नवाब मलिक यांनी वानखेडेंवर हजारो-लाखो रुपयांच्या वस्तु वापरतात,कपडे घालतात असा अरोप केला आहे. त्यावरुन आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला. मलिक लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या बेडरुममध्ये जातातच कशाला? ही चांगली सवय नाही, असा सणसणाटी टोला राणेंनी मलिक यांना लगावला. तसेच, कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. तुमचं काही बाहेर काढलं तर अवघड होईल, असा इशारा नारायण राणेंनी मलिकांना दिला.
राणे म्हणाले की, भाजपचे ३०३ पेक्षाही अधिक खासदार आहेत, त्यातला एखादा कमी झाला तर पक्षाला फारसा फरक पडणार नाही. मात्र शिवसेनेचे केवळ ५६ आमदार आहेत, ते देखील मोदींच्या कृपेमुळे निवडून आले. भाजपसोबत युती केली नसती तर ८ आमदार देखील निवडून आले नसते. आधी भाजपसोबत युती केली आणि मोदींमुळे आमदार निवडून आल्यानंतर त्याच भाजपशी शिवसेनेने गद्दारी करत धोक्याने मुख्यमंत्री मिळवले. हे सर्व जनतेला माहित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी अर्धवट डोक्याचे आहेत, त्यांच्या लोकप्रतिनिधीनी कीती सिंचन प्रकल्प अर्धवट सोडले ते पाहावेत अशी टीका राणे यांनी केली.
…तर इंधनाचे दर वाढणारच
दरम्यान दोन दिवसांपूर्वी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरी उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला, उत्पादन शुल्कात कपात झाल्याने पेट्रोल 5 रुपयांनी तर, डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले. मात्र या मुद्द्यावरून विरोधक केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत आहेत. आधी इंधनाचे भाव भरमसाठ वाढवायचे आणि नंतर ते काही प्रमाणात कमी कारायचे असे भाजपचे धोरण अल्याची टीका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच काही दिवसातच हे भाव पूर्वपदावर पोहोचतील असेही काँग्रेसने म्हटले आहे. या आरोपांवर देखील राणे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. पेट्रोल, डिझेलचे दर हे अंतरराष्ट्रीय भावावर अवलंबून असातात, त्यामुळे अंतरराष्ट्रीय भाव वाढल्यास पेट्रोल डिझेलचे दर देखील वाढणारच असे राणे यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. मंत्रिपदी बसायचाही अधिकार नाही. हे भ्रष्ट मंत्री आहेत. राज्याच्या हिताचं एकही काम होत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना कळणारही नाही. भ्रष्टाचारामुळेच हे सरकार जाईल, असा दावा राणेंनी केला.
माझ्या आयुष्यात असा मुख्यमंत्री पाहिला नाही
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेटला जात नाहीत. मंत्रालयात जात नाही. काय काम करायचं तेही माहीत नाही. पण नको त्या विषयावर बोलतात. हे काय मुख्यमंत्री आहेत का? माझ्या आयुष्यात कोणत्याच राज्यातील असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. मला वाटतं राज कपूर नंतर यांचंच नाव घ्यावं लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. मातोश्रीत बसूनच सर्व काम होतात. महाराष्ट्र पाहा किती प्रगती केली आहे. लोकांच्या हिताचं एक तरी काम केलं का? अशी फटकेबाजीही त्यांनी केली.




