गोव्यात भाजपला आव्हान; शिवसेना स्वबळावर लढणार
पणजी : शिवसेनेनं महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाविरोधात उघडउघड दंड थोपाटल्यानंतर शिवसेना आता विविध राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यावर भर देत आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत सेनेने तृणमुल कॉंग्रेसला आपला पाठिंबा दिला आहे. यानंतर आता शिवसेनेनं आपला मोर्चा गोवा विधानसभा निवडणूकीकडे वळवला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गोव्यातील मतांची समीकरणं बदलणार आहेत.
पुढील वर्षी मार्चमध्ये गोवा विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तेथील राजकीय पक्ष आतापासूनच निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. असं असताना शिवसेनेनंही आपलं रणसिंग फुंकलं आहे. पुढील वर्षी येऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत सेना 20 ते 25 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी गोव्यात केली आहे.
गोवा विधानसभेत एकूण 40 जागा आहेत. आतापर्यंत शिवसेना येथील एकही जागा जिंकता आली नाही. गोव्यात शिवसेनेचा एकही आमदार नसताना अशी घोषणा करणं सेनेसाठी राजकीयदृष्ट्या कितपत हितकारक ठरेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण सेनेने महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर, गोव्यात नवीन राजकीय खेळी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत गोव्यातील राजकीय समीकरणं बदलेली पाहायला मिळतील. यावेळी संजय राऊतांनी गोव्यातील विरोधी पक्षावर मोठं भाष्य केलं आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आपला आवाज उठवणाऱ्या लोकांच्या मनातील प्रश्न आणि त्यांच्या अडचणी सत्ताधारी पक्षासमोर मांडायला गोव्यातील विरोधी पक्ष कमी पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.