Top Newsराजकारण

भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

अहमदाबाद : गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी आज शपथ घेतली. राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाला काही दिवसांनी शपथ दिली जाईल असं सांगितलं जात आहे.

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन, भूपेंद्र भाई यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्याचं काम पाहिलं आहे. मग ते भाजप पक्ष संघटना, नागरिक प्रशासन किंवा समाजसेवा असेल. ते निश्चितपणे गुजरातचा विकास मार्ग समृद्ध करतील, असं म्हटलंय.

नितीन पटेल यांचा कंठ दाठला

दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या नितीन पटेल यांच्या मनातील वेदना अश्रुंमधून बाहेर पडल्या आहेत. विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. पटेल यांच्या निवडीच्या घोषणेनंतर त्यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी नातेवाईक, शेजारी आणि मित्र परीवाराने गर्दी केली होती. तसेच, या निवडीचे सेलिब्रेशनही करण्यात आले. आमच्यासाठी ही अनपेक्षित सरप्राईज आहे. त्यामुळेच, घरी दिवाळीसारखं वातावरण बनलंय, असे भूपेंद्र यांच्या पत्नी हेतल पटेल यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या ३० वर्षांपासून काम करत आहे. पक्षाने गेल्या ३० वर्षात मला भरपूर दिलंय. नरेंद्र मोदी, आनंदी बेन आणि विजय रुपाणी यांच्या कॅबिनेटमध्येही मला संधी मिळाली. त्यामुळे, मी अजिबात नाराज नसून भूपेंद्र पटेल यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र, हे बोलत असताना त्यांच्या मनातील खदखद ही डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसून आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button