मुंबई : मुंबईतील सर्व शाळा आजपासून पूर्णवेळ, पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक ते बारावीच्या मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेनं सर्व शाळा पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. आजपासून म्हणजेच, २ मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोविड-१९ पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ आणि पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीनं सुरु होणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक काही दिवसांपूर्वी बीएमसीकडून जारी करण्यात आलं आहे.
परिपत्रकात पालिकेनं म्हटलं आहे की, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमांच्या नगरबाह्य विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्यात याव्यात.
विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मास्क वापरणं बंधनकारक असेल. परंतु मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल. कोविड १९ पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल, असं परिपत्रकात म्हटलं आहे.
पालिकेनं परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के असणे आवश्यक आहे. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, शाळांच्या नियमित वर्गाच्या तासांमध्ये मैदानी खेळ शालेय कवायती, तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावं.