रशियाच्या ‘स्पुटनिक’चा कोरोनावर ‘सिंगल डोस’ पर्याय !

मास्को : कोरोनावर मात करण्यासाठी रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला आहे. ‘स्पुटनिक लाईट’ असं या लसीचं नाव असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यावूर्वी रशियन कंपनीची स्पुटनिक व्ही (Sputnik V) बाजारात उपलब्ध आहे.
रशियाची पहिली लस स्पुटनिक-व्ही कोविड-१९ संसर्गाविरोधात ९७.६ टक्के प्रभावी आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले होते. ३.८ दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवर ही माहिती आधारित आहे. भारताला स्पुटनिक-व्ही लसीचे १.५ लाख डोस प्राप्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी १.५ लाख डोस पोहचण्याचा अंदाज आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) ‘स्पुटनिक लाइट’ या लसीचा एक डोस वापरण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. स्पुटनिक लाइट लसीचा एक डोस कोरोनाव्हायरस विरोधात ८० टक्के कार्यक्षम असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरडीआयएफच्या मते रशियाच्या गमलेया संस्थेने तयार केलेली लस कोविड विरूद्ध ७९.४ टक्के प्रभावी आहे. स्पुटनिक लाईटची किंमत १० डॉलरपेक्षा कमी असणार आहे. सध्या या लसीला फक्त रशियात परवानगी मिळाली आहे. कोरोनाविरोधात स्पुटनिक व्ही जगातली पहिली रजिस्टर्ड होणारी लस होती.
आरडीआयएफने एका निवेदनात म्हटले आहे, स्पुटनिक लाइट लस दिल्यानंतर २८ दिवसानंतर घेण्यात आलेल्या विश्लेषणात्मक आकडेवारीनुसार ७९.४ टक्के या लसीची कार्यक्षमता दिसून आली. रशियाच्या लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ५ डिसेंबर २०२० ते १ एप्रिल २०२१ या कालावधीत हे लसीकरण करण्यात आले होते.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटने थैमान घातले असून आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. ऑक्सिजन, औषधं, वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावलं आहे. मात्र, लसीकरण करणे हाच यावर उपाय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. पण, देशात लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे. अशात वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार या लसीला केव्हा मान्यता देते हे पाहणे महत्वाचे आहे.




