अर्थ-उद्योग

रिलायन्सचा तिमाहीचा अहवाल प्रकाशित, निव्वळ नफ्यात ४१.५ टक्के वाढ

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२१-२२ सालच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल (Reliance industries Q3 results) प्रसिद्ध केला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या काळात कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४१.५ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला १८,५८९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. रिलायन्सच्या या अहवालाकडे अवघ्या उद्योग जगताचे लक्ष लागून राहिले होते. महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स जिओ आणि रिटेल या दोन्ही कंपन्या या तिमाहीत नफ्यात आहेत. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १३,१०१ कोटी रुपये होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल वाढून तो १ लाख ९१ हजार २७१ कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी ही रक्कम १ लाख २३ हजार ९९७ इतकी होती. रिलायन्सचा या तिमाहीचा नफा हा १५ हजारांच्या जवळपास असेल अशी शक्यता मार्केटमध्ये वर्तवण्यात येत होती. पण प्रत्यक्षात तो १८,५८९ कोटी रुपये इतका झाला आहे.

या तिमाहीतील रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा (Reliance Jio Infocomm) निव्वळ नफा हा ३,६१५ कोटी रुपये इतका आहे. गेल्या तिमाहीचा विचार करता या नफ्यात २.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालापूर्वी NSE वर रिलायन्सचे शेअर्स २४७६ रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १८.२६ टक्के वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल प्रकाशित केल्यानंतर चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्सच्या या तिमाहीतील कामगिरीमुळे मला आनंद झाला आहे. आमच्या दोन्हीही कन्जुमर बिझनेस रिटेल आणि डिजिटल सर्व्हिसच्या उत्पन्नात विक्रमी वाढ झाली आहे. या पुढेही ही वाढ अशीच कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button