Top Newsफोकसस्पोर्ट्स

चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरी प्रकरणास आरसीबी जबाबदार

११ जणांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अहवालात आक्षेप

बंगळुरू : यंदाच्या आयपीएल हंगामावर तब्बल १८ वर्षानंतर रॉयल चँलेंजर्स बंगळुरूने नाव कोरले होते. या विजयानंतर कर्नाटक विधानसभा आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सत्कार सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीला आता आरसीबीचं जबाबदार असल्याचे निरिक्षण (CAT)केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने अहवालात नोंदवले आहे.

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मागील महिन्यात ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीसाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जबाबदार धरले आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय संघाने अचानक सोशल मीडियावर विजयी मिरवणूक काढण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे लाखो लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होते की, जवळ जवळ तीन ते पाच लाखाचा जमाव एकत्र येण्यामागे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जबाबदार आहे.आरसीबीने पोलिसांकडे परवानगी घेतली नाही. अचानक सोशल मीडियावर घोषणा करून टाकली आणि लोक एकत्र जमली होती. आरसीबीने अचानक केलेल्या कार्यक्रमाच्या घोषणेस ‘अराजकता निर्माण करणे’ असे लवादाने म्हटले आहे.

आदेशात म्हटले आहे की,’आरसीबीने कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय अचानक या प्रकारचा गोंधळ निर्माण केला. फक्त १२ तासांत पोलिस कायदा किंवा इतर नियमांनुसार सर्व आवश्यक व्यवस्था करू शकतील अशी अपेक्षा करता येत नाही.पोलीस देखील माणसे आहेत. ते ‘देव’ किंवा ‘जादूगार’ नाहीत आणि त्यांच्याकडे ‘अलादीनच्या दिव्यासारखे’ कोणतेही जादूई उपकरण नाही ज्याद्वारे ते फक्त बोटे हलवून कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतात.

दरम्यान अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ आणि आगाऊ माहिती द्यायला हवी होती, असा निष्कर्ष न्यायाधिकरणाने काढला, जो या प्रकरणात देण्यात आला नाही.

आरसीबी व्यवस्थापन या घटनेवर भाष्य करण्यासाठी उपलब्ध नव्हते. यापूर्वी, या घटनेसंदर्भात आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनवर आरोप लावण्यात आले होते, ज्यामुळे केएससीएचे सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांनी राजीनामा दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button