Top Newsराजकारण

समाजवादी नेत्यांच्या घरी इन्कम टॅक्सचे छापे; अखिलेश यादव यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

रायबरेली : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झालि नसली तरी सर्वच राजकीय पक्ष जोरात प्रचाराला लागले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभा व मेळाव्यांना प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. भाजपसाठी योगींपासून सारे नेते प्रचारात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उत्तर प्रदेशात जात आहेत. अशा गरमागरम वातावरणात शनिवारी सपाच्या नेत्यांच्या घरी इन्कम टॅक्सचे छापे पडताच अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजपने सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू केला आहे. या यंत्रणांनाच भाजपने जणू निवडणुकीत उतरवले आहे. प्राप्तीकर खात्याने (आयटी) छापे घातले. आता अजून ईडी, सीबीआय यांचे छापे पडणेही बाकी आहे, अशी उपरोधिक टीका अखिलेश यादव यांनी केली. पण अशा छाप्यांना आम्ही घाबरत नाही. पायाखालील वाळू सरकत असल्यानेच भाजपने हे सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला. अखिलेश यादव सध्या समाजवादी विजय यात्रेच्या आयोजनाच्या तयारीत आहेत.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव राजीव राय, अखिलेश यादव यांचे खासगी सचिव जैनेंद्र यादव तसेच आरसीएल ग्रुपचे मालक मनोज यादव यांची निवासस्थाने, कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्या. राजीव राय हे यादव यांचे निकटवर्तीय राजीव राय हे अखिलेश यांचे निकटवर्तीय असून,. २०१२मध्ये सपाचे सरकार आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. राय यांच्या कर्नाटकमध्ये शिक्षणसंस्था आहेत.

यासंदर्भात अखिलेश यादव यांनी मिश्रांवर कारवाई का नाही असा मोदींना सवाल केला आहे. ते म्हणाले की, भाजपने कितीही आकाशपाताळ केले तरी राज्यात समाजवादी पक्षाचेच सरकार येणार आहे. आमच्या पक्षातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत.

लखीमपूर खीरीमध्ये वाहनाखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. तपास यंत्रणांनी अहवाल सादर करूनही केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रांवर कारवाई का होत नाही, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मनोज यादव यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे. त्याशिवाय प्राप्तिकर विभागाने सपाचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ते राजीव राय, जैनेंद्र यादव यांच्यासह अनेक जणांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. राय यांनी आरोप केला की, ही कारवाई राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन करण्यात आली आहे. यादव हे प्रसिद्ध कंपनी आरसीएल ग्रुपचे मालक आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असून, तेथे सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या सपा यांच्यात मुख्य लढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे.

प्राप्तिकर विभागाचे अधिकारी मनोज यादव यांच्या ठिकाणांवर संपूर्ण तयारीसह पोहोचले होते. या अधिकाऱ्यांसोबत १२ गाड्यांचा ताफा होता. त्यांच्या संपूर्ण घराला सुरक्षा दलांनी वेढा दिला. तसेच घरातील सदस्यांची चौकशी सुरू आहे. तसेच समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राय यांच्या मालमत्तांवरही सुरक्षा दलांनी पहारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button