कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज?; फडणवीसांचा प्रतिसवाल

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले. कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस आज नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे, असं फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस भडकले. तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले. नाराज नाही तर मग मुंडे भगिनींनी ट्विट का केलं नाही?, असा सवालही फडणवीसांना करण्यात आला. या प्रश्नावर फडणवीस काहीसे भडकले. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले.
राणेंच्या क्षमतेचा विचार करून मंत्रिपद
मंत्रिमंडळ विस्तारात खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेची युती पाहायला मिळू शकते, अशी चर्चा सुरु आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, अशा चर्चा होत राहतात. अशा चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात. नारायण राणेंना त्यांचा क्षमतेचा विचार करुन केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार केला गेलेला नाही.
मी ईडीचा प्रवक्ता नाही
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशाप्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नाही, असं फडणवीस म्हणाले.
नाशिकला ५० वर्षानंतर प्रतिनिधीत्व
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातील चार लोकांना संधी मिळाली आहे. खातीही चांगली मिळाली आहेत. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले आहे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असं सांगतानाच नाशिक जिल्ह्याला ५० वर्षानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळालं, असं त्यांनी सांगितलं.