Top Newsराजकारण

पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेणार; सर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ४८ तासांचा अलर्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी, २४ जूनला जम्मू काश्मीरबाबत बैठक होणार आहे. यात बैठकीला जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. या बैठकीत जम्मू काश्मीरबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असं सांगितले जात आहे. तत्पूर्वी मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच हायस्पीड इंटरनेट सेवाही बंद ठेवल्या जाऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरहून दिल्लीत पोहचल्या आहेत. २४ जून रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत त्या सहभागी होतील. तसेच या बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू काश्मीर भाजपा अध्यक्ष रविंदर रैना आणि पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ताही जम्मूहून दिल्लीसाठी रवाना झालेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या राजकीय पक्षांची गुपकर संघटनेने निर्णय घेतला आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २४ जून रोजी जम्मू काश्मीरसंदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात जम्मू काश्मीरच्या पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे.

या बैठकीपूर्वी मंगळवारी श्रीनगरमध्ये गुपकार संघटनेची बैठक झाली. ही बैठक माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांच्या निवासस्थानी झाली. गुपकार संघटनेच्या बैठकीनंतर फारूक अब्दुला म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार आहे. या बैठकीनंतर श्रीनगर आणि दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला जाईल. गुपकार संघटनेचा जो अजेंडा आहे तोच यापुढे कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केले.

सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरच्या एकूण १६ नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७०, ३५ ए हटवल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यातील नेत्यांसोबत संवाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जम्मू आणि काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देणे हाच बैठकीचा प्रमुख अजेंडा राहणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. मात्र, विशेष दर्जाच्या मागणीबाबत त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले नाही. जम्मू आणि काश्मिरातील काँग्रेस नेत्यांसोबतही याबाबत चर्चा करणार असून, त्यानंतर पक्षश्रेष्ठींचेही मार्गदर्शन घेणार असल्याचे आझाद यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसच्या जम्मू आणि काश्मीर धोरण आखणी गटाच्या बैठकीत पक्षाच्या भूमिकेबाबत अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button