
चंदिगढ : माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंनी आज आपली पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. अमरिंदर सिंग थोड्याच वेळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्या आधीच सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आता सारे लक्ष अमरिंदर सिंग यांच्या भूमिकेकडे लागले आहे.
देशभरात भाजपचा झंझावात सुरु असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंगांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले. भाजपतील वादामुळे काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांची विकेट काढली. यामुळे नाराज झालेले व दिवंगत राजीव गांधी यांचे मित्र असलेले कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपत प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या घडामोडींनंतर सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये सिद्धू यांनी म्हटले आहे की, मी पंजाबचे भविष्य आणि पंजाब कल्याणाच्या अजेंड्यासोबत समझोता करू शकत नाही. यामुळे मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देत आहे. सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Punjab Congress chief Navjot Singh Sidhu resigns pic.twitter.com/KbDbderXeo
— ANI (@ANI) September 28, 2021
खरं तर, जेव्हा पंजाबमध्ये मंत्र्यांची नावे ठरवली गेली, तेव्हा राहुल गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी चर्चा करुन ठरवली होती. यात नवज्योत सिंग सिद्धू यांचा कुठेही समावेश नव्हता. पहिल्या दिवसाच्या बैठकीत त्यांना निश्चितपणे बोलावण्यात आले होते. पण, जेव्हा राहुल गांधी शिमलाहून परतले तेव्हा सिद्धू यांना बैठकीत सहभागी करण्यात आले नव्हते. दुसरं कारण असेही मानले जाते की ज्या लोकांची नावे मुख्यमंत्री चन्नी यांनी निवडली मग डीजीपी असो किंवा अॅडव्होकेट जनरल यामध्येही सिद्धू यांचा विचार केला गेला नाही. मंत्र्यांची नावे ठरवताना त्यांना हायकमांडने सहभागी करुन घेतलं नाही, पोर्टफोलिओ ठरवताना त्यांना विचारले गेले नाही. अशा स्थितीत पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपली नाराजी हायकमांडसमोर नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे.
पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. शेवटी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेसचा चेहरा जर नवज्योत सिंग सिद्धू असतील तर त्यांच्या पराभव करण्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या आधीच स्पष्ट केलंय.




