
सांगली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगलीतील भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने आयोजित केलेली राष्ट्रीय ऑनलाईन क्रिटिक कॉम्पिटिशन यशस्वीरित्या संपन्न झाली. सदर स्पर्धेचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. पूजा नरवाडकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय यशोमती ठाकूर म्हणाल्या, “स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब हे माझे गुरु आहेत व गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तनाचे व्रत जोपासणारे साहेब हे आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहतील.” याचबरोबर अशा नावीन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी कॉलेजचे कौतुक केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यातून महाविद्यालये, विद्यापीठे व लॉ स्कूल्समधील 190 विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रथम फेरीत त्यातील 42 विद्यार्थी निवडले गेले तर अंतिम फेरीसाठी 9 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यातील सर्वोत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक रुपये 5000, द्वितीय पारितोषिक रुपये 3000 व तृतीय पारितोषिक रुपये 2000 देण्यात आले. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. आनंद पवार, डॉ. ज्योती धर्म व डॉ. दीपा श्रावस्ती आदी मान्यवरांनी काम पाहिले .
कार्यक्रमाच्या समारोप समारंभासाठी अध्यक्ष म्हणून राणी दुर्गावती विश्व विद्यालय, जबलपूर मधील विधी विभागप्रमुख माननीय डॉ. दिव्या चांसोरिया यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या प्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व महाविद्यालयाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक संजीव साबळे यांनी केले. स्पर्धेचे संयोजन प्राचार्य डॉ. पूजा नरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संजय आहेर व प्रा. श्रेयश मोहिते यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी अरवटगी व कु. श्रीलक्ष्मी मुंडनचेरी यांनी केले. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या वैचारिक चर्चा वारंवार आयोजित केल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करत या अभिनव स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले.