आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार, नाराज असण्याचं कारण नाही : पंकजा

मुंबई : आमच्या नावाची नेहमीच चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचे कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणे कर्तव्य आहे, असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. नूतन मंत्र्यांचे साधे अभिनंदनही त्यांनी केले नाही, असाही आक्षेप घेण्यात आला होता. पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
शपथविधीपर्यंत संभाव्य नेते अशा बातम्या येत होत्या. त्यामुळे त्यावेळी अभिनंदन करणे योग्य नव्हते असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे. मी भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी बोलले होते. त्यांना आदल्या दिवशी मेसेज आल्याने ते दिल्लीत होते आणि प्रीतम मुंडेंना मेसेज नसल्याने त्या मुंबईत होत्या. काही महान लोकांनी, ‘पंकजा मुंडेंनी ट्विट केलं म्हणून प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद गेलं’ असे म्हटले असून हे हास्यास्पद आहे, असेही यावेळी त्या म्हणाल्या.
भागवत कराड यांचा रात्री १२.३० वाजता फोन आला होता. मुख्यालयातून फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालो आहे अशी माहिती त्यांनी दिली होती असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. माझे लोकांशी नाते आहे, संबंध नाही. नाते कधीच तुटत नाही, पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचे प्रेम असल्याने ते व्यक्त होत असतात असे यावेळी त्या म्हणाल्या.
भाजपमध्ये एक पद्धत आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेतले जातात. सगळ्या राज्यांच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय झाले होते. फक्त प्रीतम मुंडे नाही तर हिना गावित यांचेही नाव चर्चेत होते. नव्या लोकांना संधी देण्यास काही हरकत नाही, त्यांच्यात काही गुण असू शकतात जे पक्षासाठी भविष्यात फायद्याचे ठरु शकतात. त्यामुळे हरकत असण्याचे कारण नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
‘जे मत असतं ते वैयक्तीक असतं. ते जाहीरपणे व्यक्त करायचं नसतं. प्रीतम मुंडे यांचं नाव होतं आणि ते योग्य होतं. त्या विक्रमी मताने निवडून आल्या आहेत. त्यांनी छान काम केलं, खूप हुशार आहेत. सर्व बैठकींना त्या उपस्थित असतात. कोणताही कार्यक्रम डावललेला नाही. तरुण आहेत, बहुजन चेहरा आहेत. म्हणून त्यांचं नाव न येण्यासारखं काही नाही. केवळ प्रीतम ताईंचंच नाव आलं नाही असं नाही. चर्चा नावाच्या वलयामुळे होत आहे,” असं यावेळी त्या म्हणाल्या.
“पक्षाचे निर्णय पटण्याचा विषय नाही. कारण पक्षाने मला फॉर्म भरायला लावला तेव्हाही मी पात्र आहे का असं विचारलं होतं. नंतर त्यांनी रमेश आप्पा कराड यांचं नाव अंतिम झाल्याचं सांगितलं होतं. तो निर्णयही मला पटला होता. पक्ष आमच्या संस्कारात अंतिम सत्य आहे. त्यामुळे निर्णय पटणं आणि न पटणं हा प्रश्न नसतो,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं




