मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली कार; घातपाताचा संशय

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित कार आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. मुंबई पोलीस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपासणी केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गाडीत स्फोटकं असल्याचं समोर येत आहे. पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल आहे. अंबानींच्या बंगल्याजवळ संबंधित गाडी बराच वेळ थांबली होती. पोलिसांनी पार्किंगच्या अनुषंगाने जरी कारवाई केली त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला. आता सगळ्या यंत्रणा परिसरात पोहोचल्या आहेत. संबंधित परिसर हा व्हिआयपी आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असतो.
अंबानी यांना यापूर्वीच केंद्रीय सुरक्षा दलाकडून सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांची सुरक्षा आहे. ही सुरक्षा तीन ते चार पद्धतीत आहे. इतकी सुरक्षा असूनही संबंधित कार परिसरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतलं आहे.
अंबानी यांना धमकीचे पत्र
अंबानी यांना याआधी धमकीचे पत्र आले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात त्यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यांच्या बंगल्यापर्यंत ही सुरक्षा व्यवस्था आहे. सरकारकडून गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.
गाडीत धमकीचे पत्र
गाडीत स्फोटकांसोबत धमकीचे पत्र देखील आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित परिसर हा व्हिआयपी परिसर आहे. विशेष म्हणजे ज्या रोडवर गाडी उभी होती त्या रस्त्यावर सर्व मंत्री, मोठमोठे उद्योगपती यांची ये-जा असते.