मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजाजन काळे यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीचीच तक्रार
नवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
पती गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. अखेर बुधवारी रात्री काळे यांच्या पत्नीने नेरुळ पोलीस ठाण्यात पती गजानन काळे यांच्या विरोधात तक्रार केली. त्यानुसार अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन काळे यांचे अन्य महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचा उल्लेख त्यांच्या पत्नीने तक्रारीत केला आहे. यासंदर्भात गजानन काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरुळ पोलिस स्थानकात गजाजन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने गुन्हा नोंदविला आहे. रंग, जात यावरुन आपला पती सतत टोमणे मारत असल्याचं पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. प्रसंगी जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचा आरोप गजाजन काळे यांच्या पत्नीने केला आहे.
गजानन काळे यांचे परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असल्याचं अनेक वेळा माझ्या निदर्शनास आलं आहे. त्याला येणारे फोन कॉल, मेसेजवरुन ते लक्षात येतं. मी त्याला वारंवार समजून सांगायचे, पण माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत. तू याच्यात लक्ष घालू नको, असं म्हणून तो मला मारहाण करायचा, असंही गजानन काळे यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे.
२००८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही… तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गजानन काळे आपल्याला सुनावत होते असे, त्यांच्या पत्नीने म्हटले आहेत.