आठ दिवसांपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, १६ प्रादेशिक कार्यालयांतील कामकाज ठप्प

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (Maharashtra Industrial Development Corporation) सर्व्हर ८ दिवसांपासून हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आहे. गेल्या सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाला आहे. यामुळे मुंबईतील मुख्य कार्यालयासह राज्यातील सोळा प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. हा सर्व्हर हॅक करणाऱ्या हॅकर्सकडून तब्बल पाचशे कोटींची मागणी करण्यात आली आहे. या हॅकर्सने Midc च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही मागणी पूर्ण केली नाही, तर डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील संपूर्ण महत्वाचा डेटा नष्ट करु, अशी धमकी देण्यात आली आहे.
एमआयडीसीशी संबंधित सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर आहे. या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. एमआयडीसीतील कॉम्प्युटर सुरु केल्यानंतर त्यात व्हायरस दिसत आहे. त्यामुळे जर या सिस्टिममध्ये प्रवेश केला, तर डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे एमआयडीसीने सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरु करु नका, अशी सूचना केली आहे.
एमआयडीसीचा सर्व्हर हॅक प्रकरणी सर्व डेटा रिस्टोर करावा. त्याशिवाय याबाबत सायबर सेलकडे तक्रार करावी, असे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान हे हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत या संदर्भात अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. सध्या त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मात्र एमआयडीसीच्या डेटा हॅक झाल्याचे समोर येताच एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरु करण्यात आली आहे. एमआयडीसी सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे.
दरम्यान याआधीही गेल्यावर्षी मुंबई आणि परिसरातील वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता MIDC चा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.