
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे ५ व १० रुपयांनी कमी करण्याचा केंद्र सरकारने बुधवारी घेतलेला निर्णय हे निव्वळ नाटक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केली आहे. तर उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांनंतर पुन्हा इंधनांच्या दरात केंद्र सरकार वाढ करण्याची शक्यता आहे, अशी टीका अन्य विरोधी पक्षांनी केली आहे.
केंद्राने घेतलेल्या निर्णयानंतर आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आदी भाजपशासित राज्यांनी पेट्रोल, डिझेलचे भाव आणखी कमी केले. तर एनडीएचे सरकार असलेल्या ओडिशा, बिहार राज्ये तसेच सिक्कीम व पुड्डुचेरी यांनीही असा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयावर विरोधकांनी कडक टीका केली आहे.
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले की, पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हे निव्वळ नाटक आहे. केंद्र सरकारने इंधन तेलाचे दर प्रति लिटर ५० रुपये इतके कमी केले पाहिजेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर केंद्र सरकार पुन्हा पेट्रोेल, डिझेलचे भाव वाढविणार असल्याचा दावाही यादव यांनी केला.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, जनतेवर दया आली म्हणून नव्हे तर जनतेला घाबरल्याने केंद्र सरकारने पेट्रोेल, डिझेलच्या किमती कमी केल्या आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवून केंद्र सरकारने लूट चालविली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आगामी निवडणुकांत जनतेने केंद्र सरकारला धडा शिकविला पाहिजे.
माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी सांगितले की, विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला जो दणका मिळाला, त्यामुळेच केंद्र सरकारने इंधन तेलाच्या किमती कमी केल्या आहेत. तामिळनाडूचे वित्तमंत्री पी. थिगया राजन यांनी सांगितले की, मोदी सरकारने इंधन तेलाच्या दरांमध्ये जितकी वाढ केली तितक्या प्रमाणात त्यात कपात केलेली नाही.
…तर देशभर भाजपचा पराभव करावा लागेल; संजय राऊत
देशातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. मग ५० रुपयांनी पेट्रोल स्वस्त करायचं असेल तर आपल्याला आता संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल, असा चिमटा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काढला आहे.
केंद्रानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पण ही दर कपात पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवाचं फलित आहे. आता ५ रुपयांची पेट्रोल स्वस्त झालंय. पण ५० रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर आपल्याला संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल आणि २०२४ साली ते नक्कीच होईल, असं संजय राऊत म्हणाले.
तुम्ही स्वत:ला मोठ्या मनाचे म्हणवून घेता. मग पेट्रोल फक्त ५ रुपयांनी स्वस्त करुन काय फायदा? हा तर जनतेचा अपमान आहे. पेट्रोल-डिझेल आज शंभरी पलिकडे आहे. तुम्ही खरंच मोठ्या मनाचे असता तर पेट्रोल-डिझेल २५ ते ३० रुपयांनी स्वस्त केलं असतं. तुम्ही मोठ्या नव्हे, तर सडक्या मनाचे आहात. दिवाळीच्या दिवशी असे शब्द वापरणं योग्य नाही. पण माझा नाईलाज आहे. आज दिवाळी असली तरी जनतेची दिवाळी झालेली नाही. जनता महागाईनं त्रस्त आहे, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा दर कमी होतील : मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत, भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील, असे म्हटले आहे. मोदी सरकारकडून होणारी लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला. यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशात आधीच पेट्रोल आणि डिझेलचे १०० रुपयांच्या वर गेले आहेत. त्यात आता केवळ ५ ते १० रुपयांची कपात करण्यात येत आहे. यामुळे देशवासीयांना काहीसा दिलासा मिळू शकेल. मात्र, यात आणखी कपात करणे आवश्यक आहे. तसेच केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.




