राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन?; ३० एप्रिलला निर्णय होणार
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाऊनबाबत चर्चा झाली मात्र कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. राज्यातील कोविड स्थिती लक्षात घेता सध्या जे लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत ते १५ मे पर्यंत वाढवले जावेत असे मत बहुतांश मंत्र्यांनी मांडले असून ३० एप्रिल रोजी यावर निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर दिली.
राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन वाढवावा लागणारच आहे. यावर सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे आता नेमका १५ दिवस लॉकडाऊन वाढवायचा की त्यापेक्षा कमी वा अधिक दिवस याबाबत निर्णय घ्यायचा असून ३० एप्रिल रोजी त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले. १५ दिवसांच्या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब होऊ शकते असा माझा अंदाज असल्याचेही ते पुढे म्हणाले.
‘ब्रेक द चैन’अंतर्गत राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावं लागेल, अशी परिस्थिती आहे. सर्व मंत्री लॉकडाऊन वाढविण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी लॉकडाऊन १५ दिवस वाढवायचा की काय करायचे, याचा निर्णय घेतला जाईल, असे टोपे म्हणाले. लॉकडाऊन हे वाढणारच आहे. हा लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढेल असा माझा अंदाज आहे, असे टोपे यांनी सांगितले.