नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक येथे डिसेंबरमध्ये पार पडलेल्या वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेत कौतुक केले आहे. नाशिकमधील वरिष्ठ विधीज्ञ विवेकानंद जगदाळे यांच्या संकल्पनेतून १२-१३ वर्षांपासून सुरु असणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस २०२५ च्या डिसेंबरमध्ये मिळालेले हे मोठे यश मानावे लागेल. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक करताना सांघिक खेळाची कॅटेगरी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडे नसल्याचा खेदही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडून व्यक्त करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे मुख्य आयोजक अॅड. विवेकानंद जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन, नाशिक बार असोसिएशन, नाशिक जिल्हा क्रिकेट व स्पोर्ट्स असोसिएशन, आणि महाराष्ट्र अॅडव्होकेट क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात. यंदा अमरावती बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष. अॅड. नितीन ठाकरे व अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील देशुमख यांच विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात यंदा प्रथमच राज्यातील तब्बल ११४ पुरुष संघांनी सहभाग नोंदवला. या माध्यमातून राज्यभरातील सुमारे २ हजार वकिलांनी नाशिकमधील २८ मैदानांवर सलग १० दिवस क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. दोन ते अडीच हजार वकिलांच्या निवास व भोजनाची दहा दिवस व्यवस्था नाशिक शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी शांततेत पार पाडण्यात आली. याच आयोजनाचे लिम्का बुककडून कौतुक करणारा मेल आल्याचे व त्यांच्याकडून शुभेच्छा मिळाल्याचेही अॅड. विवेकानंद जगदाळे यांनी सांगितले.
या स्पर्धेला आणि लिम्का बुककडून मिळालेल्या शाबासकीला एक वेगळा कंगोरा आहे. दोनच महिन्यात येवू घातलेल्या महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीच्या निमित्ताने याला मोठे महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.
कोणताही राजकीय हेतू न ठेवता केवळ वकिलांमधील सांघिक भावना वाढवण्यासाठी वकिलांच्या स्पर्धां इतक्या मोठया पातळीवर यशस्वी करण्याचे काम १२ वर्षांहून अधिक काळ आयोजक अॅड. जगदाळे यांनी केले आहे आणि याला आता लिम्का बुकच्या कौतुकाने एक विशेष ओळख मिळते आहे.
यंदाच्या वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांना मिळालेले यश, स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असणारे दोन दिग्गज क्रिकेटर, उच्च न्यायाधीशांची आजवरची उपस्थिती आणि संपूर्ण नियोजनात त्यांचे पाठीराखे असणारे मुंबई, पुणे, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील अनेक ज्येष्ठ विधीज्ञ, राज्यभरातील युवा वकील मंडळी आणि अनेक न्यायाधीश मंडळी यासोबतच आयोजन कमिटीमधील सर्व वकील सहकारी, मुख्य प्रायोजक संदीप फाऊंडेशन आणि अनेक वकील मित्रांनी केलेले सहकार्य यामुळे ही स्पर्धा प्रति वर्षी अधिक ताकदीने रंगल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याविषयी अॅड. जगदाळे म्हणाले की, मी क्रिकेटवर प्रेम करतो. या स्पर्धेमुळे राज्यभरातील सर्व स्तरातील वकिलांना राजकीय हेतुशिवाय, जाती धर्म विरहीत मी मैत्रीच्या भावनेने एकत्र करु शकलो आणि हीच माझी खरी कमाई आहे, माझ्यासाठी मैत्री अधिक महत्वाची आहे.




