स्पोर्ट्स

भारतीय फलंदाजांचे न्यूझीलंडसमोर लोटांगण; दुसरा डाव १७० धावांवर गडगडला

न्यूझीलंडसमोर विजयासाठी माफक लक्ष्य

साऊदम्पटन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर अक्षरशः लोटांगण घातले. भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. त्यामुळे भारताचा पराभव आता जवळपास निश्चित समजला जात आहे. कारण न्यूझीलंडपुढे विजयासाठी १३९ धावांचे माफक आव्हान भारताने ठेवले आहे आणि तिसऱ्या सत्रात ते हे आव्हान सहजपणे पूर्ण करतील, असे दिसत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा न्यूझीलंडने १४ षटकात १ बाद ३४ धाव केल्या होत्या.

तत्पूर्वी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे प्रमुख फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रिषभ पंतनं चांगला खेळ करताना आशा पल्लवीत केल्या. पण, रवींद्र जडेजा व आर अश्विन या दोन अष्टपैलू खेळाडूंना त्याला साथ देता आली नाही. रिषभनेही आत्मघातकी फटका मारून स्वतःची विकेट फेकली. त्यामुळे फ्रंटसिटवर बसण्याची संधी असलेल्या टीम इंडियाला मागच्या बाकावर जाऊन बसावं लागलं आहे. आता भारतीय गोलंदाजांकडून करिष्म्याची अपेक्षा आहे.

दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुभमन गिल अपयशी ठरला. रोहित शर्मा व पुजारानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहितला बाद करून टीम साऊदीनं ही जोडी तोडली. सहाव्या दिवशी कायले जेमिन्सनने धक्के दिले. कोहली (१३), पुजारा (१५) आणि रहाणे (१५) माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या विकेट्स घेत टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०९ अशी केली. रिषभ-रवींद्रनं लंच ब्रेकपर्यंत एकही विकेट पडू न देता धावसंख्या ५ बाद १३० वर नेऊन ९८ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. कोहली व पुजारा माघारी परतल्यानंतर रिषभ व अजिंक्य हे चांगले खेळत होते. पण, बोल्टनं ही भागीदारी तोडली. रवींद्र जडेजा व रिषभ यांनीही संयमी खेळ केला, परंतु लंच ब्रेकनंतर निल वॅगनरनं भारताला सहावा धक्का दिला. जडेजा १६ धावांवर बाद झाला. आता रिषभ पंतवरच सर्व मदार होती आणि आर अश्विनला सोबत घेऊन तो सावध खेळ करताना दिसला. रिषभकडून गॅबा कसोटीच्या पुनरावृत्तीची सर्वांनी अपेक्षा लावली होती. निल वॅगनर, कायले जेमिन्सन यांना रिषभला माघारी पाठवता आले नाही, म्हणून केननं ट्रेंट बोल्टला पाचारण केलं. बोल्टच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात रिषभनं टोलावलेला चेंडू हवेत उंच उडाला अन् हेन्री निकोल्सनं भन्नाट रनिंग कॅच घेतली. रिषभ ८८ चेंडूंत ४१ धावांवर माघारी परतला. त्याच षटकात बोल्टनं टीम इंडियाला आणखी एक धक्का देताना आर अश्विनला माघरी पाठवलं. मोहम्मद शमीनं झटपट १३ धावा करून वेग वाढवला, परंतु टीम साऊदीनं त्याला बाद केलं.

भारताला जर पराभव टाळायचा असेल तर आतापर्यंत फायनलच्या सामन्यात दोन दिवस दमदार फलंदाजी करणारा पाऊस आला, तरच ही गोष्ट होऊ शकते. पावसाचे वातावरण आणि ढग दाटून आले तरी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे आता तिसऱ्या सत्रात पाऊस पडावा आणि भारताचा पराभवा टळावा, अशीच आशा भारतीय चाहत्यांच्या मनात असेल.

आजच्या दिवशी ३३० मिनिटांचा खेळ होऊ शकतो. यामध्ये निर्धारीत ८३ षटके टाकली जातील, त्याचबरोबर जर सामना निकाली लागत असल्याचे दिसत असेल तर अतिरीक्त १५ षटके खेळवली जाऊ शकतात. आयसीसीचा दुसरा नियम असा आहे की, सामन्याचा जेव्हा अखेरच्या तासाचा खेळ सुरु होईल तेव्हा दोन्ही कर्णधारांना या लढतीबाबत निर्णय घेता येणार आहे. जर हा सामना निकाली निघणार नाही, असे दोन्ही कर्णधारांना वाटत असेल तर त्यावेळी ते दोघे एकत्र येऊ हा सामना अनिर्णीत झाल्याचे सांगू शकतात. त्यानंतर हा अजिंक्यपदाचा चषक दोन्ही संघांमध्ये विभागून दिला जाणार आहे. पण जर एकही कर्णधार सामना खेळवण्यासाठी इच्छूक असेल तर हा सामना अखेरपर्यंत खेळवला जाऊ शकतो. त्यानंतर हा सामना कधी थांबवायचा हा निर्णय पंचांच्या हातामध्ये असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button