विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताला ३० पदके

नवी दिल्ली : भारताच्या नेमबाजांनी नवी दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धेत दमदार कामगिरी केली. भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेत एकूण सर्वाधिक ३० पदके पटकावली, ज्यात १५ सुवर्णपदकांचा समावेश होता. भारताची विश्व नेमबाजी स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या विश्व नेमबाजी स्पर्धेपासून भारताच्या नेमबाजांनी विविध विश्व नेमबाजी स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवले आहे. मागील सलग सहा विश्वचषकांत पदक तक्त्यामध्ये भारत अव्वल स्थानावर राहिला आहे.
यंदाच्या विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताला १५ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्यपदके मिळाली. त्यामुळे एकूण ३० पदकांसह भारत पदकतक्त्यात अव्वल स्थानावर राहिला. अमेरिकेला दुसऱ्या (एकूण ८ पदके), तर इटलीला तिसऱ्या स्थानावर (एकूण ४ पदके) समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी श्रेयसी सिंग, मनीषा कीर आणि राजेश्वरी कुमारी या भारताच्या नेमबाजांनी महिला ट्रॅप सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. भारताच्या या महिला त्रिकुटाने कझाकस्तानचा ६-० असा पराभव केला. त्यानंतर कॅनन चेनै, पृथ्वीराज आणि लक्ष्य शेरॉन या त्रिकुटाने स्लोव्हाकियाच्या त्रिकुटावर ६-४ अशी मात करत पुरुषांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.