भारतात होणार टी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषकही !

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी) ने पुढील १० वर्षांसाठी कोणत्या देशांत कोणती स्पर्धा होणार याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. यानुसार २०२४ ते २०३१ या काळात टी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वन-डे क्रिकेटचा वर्ल्ड कप अशा साऱ्या स्पर्धा कुठे होणार हे स्पष्ट झालं आहे. यजमान देशांची नाव समोर आली आहे. त्यानुसार भारतात यातील तीनही महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. यात २०२६ मध्ये टी-२० वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्यात मिळून होईल. तर २०२९ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन भारतात होईल. तर २०३१ मध्ये भारत आणि बांग्लादेश मिळून वन-डे वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहेत.
आयसीसीने २०२४ ते २०३१ पर्यंतच्या प्रत्येक वर्षीच्या एका मोठ्या स्पर्धेचं ठिकाण जाहीर केलं आहे. यावेळी अमेरिकेत पहिल्यांदा एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन होईल. २०२४ चा टी-२० वर्ल्ड कप अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीज हे देश मिळून याचे आयोजन करतील.
आयसीसीच्या कार्यक्रमांची यादी :
२०२४ : टी-२० वर्ल्ड कप- वेस्ट इंडीज आणि अमेरिका
२०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी- पाकिस्तान
२०२६ : टी-२० वर्ल्ड कप- भारत आणि श्रीलंका
२०२७ : वर्ल्ड कप (एकदिवसीय ५० षटकांचे सामने) – दक्षिण आफ्रीका, जिम्बाब्वे आणि नामीबिया
२०२८ : टी-२० वर्ल्ड कप- ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलैंड
२०२९ : चॅम्पियन्स ट्रॉफी- भारत
२०३० : टी-२० वर्ल्ड कप- इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड
२०३१ : वर्ल्ड कप (एकदिवसीय ५० षटकांचे सामने) – भारत आणि बांग्लादेश




