Top Newsराजकारण

महाराष्ट्रात कायद्याचे नाही, तर ‘काय ते द्या’चे राज्य : फडणवीस

भ्रष्टाचार, वसुलीच्या आरोपासह भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार या मुद्य्यांवरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर चौफेर प्रहार केले. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी सरकारच्या कारभारावर शेलक्या शब्दांत टीका केली. आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आले आले. आज राज्य सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. राज्याला एक मुख्यमंत्री आहेत. पण त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. सध्या राज्यात असलेल्या सरकारचे राज्य म्हणजे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय ते द्या‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यात नेत्यांचे दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आहेत. अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती, असे सांगून फडणवीस म्हणले की, राज्यातलं सध्याचं सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरत असून जनतेच्या कल्याणाकरता आपल्याला मैदानात उतरावच लागेल. २०२४ आधी राज्यात आपलं सरकार आलं तर बोनस समजू. तसं जर झालंच तर जनतेला उत्तम पर्याय आपण देऊच. पण येणाऱ्या काळात भाजपाचं स्वत:च्या भरवशाचं स्वत:चं सरकार आपण आणून दाखवू.

दंगलीतील ष़डयंत्र उघड होऊ नये म्हणून मलिकांकडून कव्हर फायरिंग

राज्यातील काही शहरांमध्ये ज्या काही दंगली घडल्या त्या एक षडयंत्र होत्या. त्याला कव्हर फायरिंग म्हणून नवाब मलिक यांनी मैदानात उतरून भाजपावर आरोप केले. अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा. अमरावतीत एसआरपीच्या ७ तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाही. आझाद मैदानात जे झाले तो सेम पॅटर्न अमरावतील राबवला गेला. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक नाही. आमचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

विचारांचा नक्षलवाद आता नाही

एकेकाळी विचारांचा नक्षलवाद होता. मात्र आता विचारांचा नक्षलवाद राहिला नाही. आता तो दहशतवाद्यांशी निगडित आहे, असे विधान फडणवीस यांनी केले. आमचे एकेकाळचे हिंदुत्त्ववादी मित्र आता अजान स्पर्धा घेतात. बाळासाहेबांचा उल्लेख जनाब असा करतात. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यात शिवसेनेला अमराठी वा मराठी कुठलीही मते मिळणार नाही. आता केवळ अल्पसंख्याक मतांवर त्यांचा डोळा आहे. एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, महाराष्ट्रात हे काय चालले आहे. सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण शक्ती, युक्ती काही नाही तर सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे.

फडणवीस यांनी यावेळी कोरोना संकट, वीजबील थकबाकी, लसीकरण, शेतकरी कर्जमुक्ती योजना, कुपोषण, इंधन दरकपात अशा सर्वच मुद्द्यांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सरकार दररोज तोंडावर पडतंय आणि संपूर्ण जनता हे पाहात आहे. मोदीजींचं अभूतपूर्व काम आपल्या पाठिशी आहे. त्यांच्या कामाच्या जोरावर आपण जनतेत जाऊ आणि येणाऱ्या काळात आपल्याला युद्धाला तयार राहावं लागेल. आता काही लोक बोलतील हे युद्ध काय शस्त्रांनी लढायला जाणार आहेत का? पण जनतेच्या कल्याणाकरता आपल्याला मैदानात उतरावच लागेल. पहिल्यांदा यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाणी पाजू आणि २०२४ आधी राज्यात आपलं सरकार जर आलंच तर ते आपण ‘बोनस’ समजू. त्यापरिस्थितीतही उत्तम पर्याय देण्याचं काम आपण करु. पण येत्या काळात राज्यात स्वत:च्या भरवशाचं आणि आपलं सरकार आणून दाखवू असा मला विश्वास आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लसीकरणात मोदींनी जगासमोर आदर्श निर्माण केला

कोरोना विरोधी लसीकरणात भारतानं केलेल्या विक्रमाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लसीकरणावरही भाष्य केलं. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं असं आज राज्य सरकार सांगतंय. ते चांगलंच आहे. आपला महाराष्ट्र लसवंत होतोय याचा अभिमानच आहे. पण राज्याला या लसी दिल्या कुणी? मोदींनी महाराष्ट्र राज्याकडून होणाऱ्या टीका बाजूला ठेवून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचीच भूमिका ठेवली, असं फडणवीस म्हणाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यावेळी परदेशी लसींना मान्यता देण्यासाठी ओरडत होते आणि मोदींवर टीका करत होते. पण मोदींनी स्वदेशी लसीच्या पाठिशी ठामपणे उभं राहून वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं, एकरकमी पैसा दिला आणि आवश्यक अशी सर्व मदत केली म्हणून आज देशातील १०० कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे, असंही फडणवीस म्हणाले. आज जर देशात लसीकरण वेगानं झालं नसतं तर आजही अर्थव्यवस्था थांबलेली असती. पण आज आपली अर्थव्यवस्था धावतेय आणि जगात सर्वाधिक वेगानं प्रगती करणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे याचं सारं श्रेय मोदींचं आहे, असंही फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले नाहीत

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केले. त्यानंतर देशातील २५ विविध राज्यांनी तेथील व्हॅट कमी करत त्यात भर घातली. मात्र महाराष्ट्र सरकारने तोही कमी केला नाही. हे सरकार काहीच करायला तयार नाही.

राज्य सरकारचे केंद्राच्या नावाने रडगाणे

छोटी-छोटी राज्य रडत नाही तर लढतात. महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी मा. नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात. बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GSTचे रडगाणे गातात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार

महाविकास आघाडीचे सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. या महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे. जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संजय राऊतांवर जहरी टीका

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही जहरी शब्दात टीका केली. संजय राऊत यांची अवस्था म्हणजे कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, अशी झाल्याची टीका फडणवीसांनी केली. तसेच, त्रिपुरामध्ये घडलेली घटना सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंसाचार घडवल्याचा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला.

भाजपचा कार्यकर्ता कधीही दंगल करणार नाही

यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्ही मतांचे राजकारण कधीही करत नाही, आम्हाला देश महत्त्वाचा आहे. अमरावती, नांदेड, मालेगाव हा फक्त ट्रेलर होता, देशात अराजकता निर्माण करण्यासाठी अल्पसंख्याकांना भडकवलं जात आहे. जी घटना घडलीच नाही त्याबद्दल चुकीचं वातावरण निर्माण करुन दंगल घडवली जात आहे. 26 ऑक्टोबरला बांग्लादेशातील हिंदुवरील अत्याचाराच्या निषेधार्थ त्रिपुरात रॅली निघते. त्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. मात्र सोशल मीडियावर सीपीआयएमच्या कार्यालयाला आग लागली तो फोटो दाखवून मस्जिदीला आग लागल्याचं सांगितले गेले. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून त्यावर हिंदू मोठ्या प्रमाणात त्रिपुरात मुस्लिमांवर हल्ला करत आहेत असं सांगितले जाते. देशात चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी ट्वीट करतात आणि…

यावेळी फडणवीसांनी राहुल गांधींवरही टीका केली. फडणवीस म्हणाले, ८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये ११ नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांना कसे काय माहित नाही ? असा सवाल त्यांनी केला. या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button