आरोग्यराजकारण

भारतात लस निर्मिती नसती तर आपण कायम लॉकडाऊनमध्ये गेलो असतो : फडणवीस

नवी मुंबई : कोरोनावर चार लसी आपण भारतात तयार केल्या नसत्या तर देशात लसीकरण शक्य झालं नसतं. अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. त्यामुळे आपण कायमस्वरूपी लॉकडाऊनमध्ये गेलो असतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईत एका कार्यक्रमाला संबोधित करताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाशी आपण सर्वच संघर्ष करत आहोत. त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजही दिले आहे. परंतु, भारतासारख्या महाकाय देशात लसीकरण मोहीम राबवणं हे कठिण काम होतं. आज आपण आपल्या देशात चार लसी तयार केल्या. त्या केल्या नसत्या तर अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. त्यामुळे आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो, असं फडणवीस म्हणाले.

कोरोना लसीवरून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करणे गरजेचं आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो, नपुसंकत्व येतं, असे संभ्रम निर्माण करण्यात आले आहेत. मात्र, आता लसीचा प्रभाव लोकांच्या लक्षात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

माथाडी कामगार हा अतिशय कठिण परिस्थितीत काम करणारा आहे. त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे. नरेंद्र पाटील यांनी लसीकरणासाठी चांगला प्रयत्न केला आहे. एनजीओच्या माध्यमातून मी स्वत: माथाडी कामगारांच्या लसीकरणासाठी दहा हजार लसी देईल. माथाडी कामगार स्वस्थ राहिला पाहिजे, असं ते म्हणाले. विदर्भ हे माझे कार्यक्षेत्र होतं. त्यामुळे माथाडी चळवळ किती महत्त्वाची आहे, याचं महत्त्व मला नरेंद्र पाटील यांनी पटवून दिलं. त्यामुळेच येत्या २३ सप्टेंबर रोजी केंद्रीय कामगार मंत्री नवी मुंबईत आणण्यासाठी मी १०० टक्के प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button