
बीड : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) अटक केली असून सध्या तो आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खान प्रकरणावरुन दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी तर एनसीबीवरच खोट्या कारवाईचे आरोप करत समीर वानखेडे यांच्या विरोधात मोठी आघाडीच उघडली आहे. त्यात आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. आर्यन खान प्रकरणावरुन भुजबळ यांनी थेट भाजपला लक्ष्य केलं आहे. उद्या शाहरुख खाननं भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील, असा जोरदार टोला भुजबळ यांनी लगावला आहे.
छगन भुजबळ बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. कोणावरही धाडी टाकल्या जात आहेत. मी बांधलेल्या महाराष्ट्र सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बैठका घेत होते. या घोटाळ्याप्रकऱणी माझ्यावर आरोप झाले. १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप माझ्यावर केला गेला. पण १०० कोटींचा ठेका घेऊन ८५० कोटींची लाच कुणी देईल का? ५ फुटाच्या म्हशीला १५ फुटाचा रेडकू कसे होईल?, असं म्हणत भुजबळांनी महाराष्ट्र सदनाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलं. यावेळी भुजबळांनी केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या घरावर झालेल्या धाड सत्राचाही अनुभव कथन केला. आमच्या घरावर १७ वेळा धाडी पडल्या. धाडी पडल्या की माझी पत्नी, मुलं घाबारुन मॉलमध्ये जाऊन बसायचे. तो काळ अतिशय विचित्र होता. दिवसभर मॉलमध्ये राहायचं आणि रात्री घरी जायचं असं माझ्या कुटुंबियांचा दिनक्रम सुरू होता. अजित पवारांच्या बहिणीची घरी धाडी टाकल्या गेल्या. आठ आठ दिवस अधिकारी घरात शिरून बसले होते, असंही भुजबळ म्हणाले.